मुंबई : रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या बहिणींवर केलेले आरोप हा केवळ एक तिचा एक अंदाज आहे, त्यामुळे यावर मुंबई पोलिसांनी थेट गुन्हा कसा दाखल केला?, तसेच सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे याची मुंबई पोलिसांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्यांनी रियाची तक्रार परस्पर नोंदवून न घेता ती सीबीआयकडे पाठवायला हवी होती, असंही सीबीआयनं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. हायकोर्टाने सीबीआयचं हे प्रतिज्ञापत्र दाखल करून घेत मुंबई पोलिसांना यावर 4 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.


सुशांत सिंह राजपूतच्या बहिणी प्रियंका व मीतू यांनी बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे सुशांतला प्रतिबंधीत औषधं देण्यात येत होती. त्यामुळे त्याची मानसिक आजार बळावला असा आरोप रिया चक्रवर्तीनं केला आहे. सुशांतच्या दोघा बहिणींनी हायकोर्टात धाव घेत ही एफआयआर रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. यावर सीबीआयनं बुधवारी हायकोर्टात आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं.


सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींनी दाखल केलेली याचिका रद्द करा, रिया चक्रवर्तीची हायकोर्टाला विनंती


या याचिकेला आक्षेप घेत रिया चक्रवर्तीनंही एफआयआर रद्द करण्याची सुशांतच्या बहिणींची ही मागणी फेटाळून लावावी, असा अर्ज हायकोर्टाला केला आहे. सुशांतची एक बहीण दिल्लीतील डॉक्टराच्या मदतीने बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे सुशांतला प्रतिबंधीत औषधं देत होती, असा आरोप रियाने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 7 सप्टेंबर रोजी सुशांतच्या बहिणी प्रियंका सिंह आणि मीतू सिंह या दोघींवर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा तसेच सीबीआयनं कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी करत प्रियंका आणि मीतू यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी सीबीआयच्यावतीने न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंठपीठासमोर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. त्यात त्यांनी म्हटलं आहे की रियानं एफआयआरमध्ये नोंदवलेले आरोप बहुधा काही गोष्टी गृहीत धरत काही अंदाजांवरून केले आहेत. त्यामुळे हे आरोप नोंदवून घेण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी करायला हवी होती.