मुंबई: मुंबईत पश्चिम मार्गावर रेल्वे रुळाला तडे जाण्यासाठी पश्चिम रेल्वेनं सागरी किनारपट्टीला जबाबदार धरलं आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, पश्चिम रेल्वेने हे अजब उत्तर दिलं आहे.

रेल्वे कार्यकर्ते समीर झवेरी यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पश्चिम रेल्वेने 3 वर्षांत 139 वेळा रुळांना तडे गेल्याच्या घटना घडल्याचे सांगितले.यात वातावरण बदलांबरोबरच रेल्वे रूळ किनारपट्टीजवळ असल्याचं कारण देण्यात आलंय.

पश्चिम रेल्वेमार्गाजवळ किनारपट्टी आहे. त्यामुळे येथील हवामान खारे असते. त्याचा थेट परिणाम रुळा खालच्या खडीवर होत असून, खडीची झीज होते आणि त्यामुळे रुळांखालील गादी नाहीशी होते. त्यामुळं तडे जाण्याच्या घटना घडतात, असंही पश्चिम रेल्वेचं म्हणणं आहे.

दरम्यान, गेल्या तीन वर्षांमध्ये रेल्वे रुळांना तडा जाण्याच्या 260 घटना घडल्या आहेत. यासाठी रेल्वेकडून विविध कारणे दिली जात आहेत. काही दिवसांपूर्वीच कल्याणजवळ विठ्ठलवाडी येथे लोकल गाडीचे पाच डबे घसरुन झालेला अपघात रुळांना तडे गेल्यानेच झाल्याचे समोर आले होते.