मुंबई : अभिनेता अर्जुन कपूरच्या अनधिकृत जिमवर मुंबई महापालिकेनं हातोडा मारला आहे. अर्जुनच्या टेरेसवरील जिमचं बांधकाम पूर्णपणे पाडण्यात आलं आहे. अर्जुन कपूरनं जुहूतल्या आपल्या राहत्या घराच्या इमारतीच्या टेरेसवर बेकायदेशीरपणे जीम उभारली होती.


30 बाय 16 चौरस मीटवर विनापरवानगी बांधलेल्या जीमसाठी मुंबई महापालिकेनं अर्जुनला मार्च महिन्यात नोटीस बजावली होती. मात्र अर्जुनकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने डिसेंबरमध्ये पुन्हा नोटीस धाडण्यात आली. महापालिकेच्या कारवाईत बेकायदेशीर जीमचं संपूर्ण बांधकाम पाडण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे अर्जुन राहत असलेल्या रहेजा ऑर्किड या इमारतीच्या रहिवाशांपैकी कोणीही ही तक्रार केली नव्हती. तर एका सामाजिक कार्यकर्त्याने मनपाकडे धाव घेतली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. फिटनेस फ्रीक अशी ओळख असलेल्या अर्जुनला आता जिमसाठी नवी जागा शोधावी लागणार आहे.