कल्याण : डोंबिवलीचा कोपर उड्डाणपूल येत्या 28 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद होणार आहे. या पुलाची दुरुस्ती करण्याची महापालिकेची मागणी रेल्वेने धुडकावली असून त्यामुळे आता पूल सुरू ठेवायला दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नाही.
सुमारे 50 वर्ष जुना असलेला हा पूल डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा प्रमुख दुवा मानला जातो. मात्र हा पूल धोकादायक बनल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. यानंतर गेल्या चार महिन्यांपासून या पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. हा पूल बंद झाला, तर डोंबिवलीत उद्भवणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेत महापालिकेनं या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी रेल्वेकडे केली होती.
मात्र ही मागणी धुडकावत हा पूल 28 ऑगस्टपासून सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश रेल्वेनं दिले आहेत. शिवाय पुढच्या आठ दिवसात या पुलावरून गेलेल्या विद्युत वाहिन्या, अन्य केबल्स काढून पुलावरील रस्ताही खोदायचे आदेश रेल्वेनं दिले आहेत.
त्यामुळे आता ठाकुर्ली पुलावरून वाहतूक वळवल्यानंतर शहराच्या दोन्ही भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे. शिवाय पूर्वेतून पश्चिमेला जाणाऱ्या विद्युत वाहिन्याही इतक्या तातडीनं स्थलांतरीत करणं शक्य नसल्यानं आता या सगळ्यावर आता दुसरा काही तोडगा निघतो का? याकडे डोंबिवलीकरांचं लक्ष लागलं आहे.