मुंबई : रेल्वेच्या उपलब्धतेवरुन केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्राकडे याद्या मागत बसू नये असं म्हटलं आहे. "महाराष्ट्रात विरोधी पक्षाचं सरकार आहे या भूमिकेतून बाहेर पडलात आणि राज्य म्हणून पाहिलं तर याद्या मागण्याचा प्रश्न येणार नाही," असंही संजय राऊत म्हणाले.


परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी हव्या तितक्या ट्रेन्स केंद्र सरकारकडून मिळत नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं होतं. त्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आक्रमक भूमिका घेत, महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे. रेल्वेमंत्र्यांनी ट्वीटची मालिका करत रात्री सव्वा बारा आणि सव्वा दोन वाजता ट्वीट करुन अडकलेल्या मजुरांची यादी अद्याप मिळाली नसून लवकरात लवकर यादी पाठवावी असं म्हटलं. 125 गाड्यांची तयारी केली असताना आम्हाला फक्त 41 ट्रेन सोडाव्या लागणार आहेत, असं पियुष गोयल म्हणाले.


महाराष्ट्राचे, मुंबईचे प्रश्न वेगळे हे मंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे
"पियुष गोयल हे राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राचे, मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत. हे केंद्रातील प्रत्येक मंत्र्याने समजून घेतले पाहिजे. सरकारने न मागताही महाराष्ट्रातून अनेक गाड्या याआधी यादीशिवाय सुटलेल्या आहेत. नागपूर, पुण्यातून सुटल्या आहेत, त्याची यादी आहे आमच्याकडे. त्यामुळे यादी कशा मागत बसता? राज्य सरकारशी संवाद ठेवला, महाराष्ट्रातील सरकार हे विरोधी पक्षाचं सरकार आहे, या भूमिकेतून बाहेर पडलात आणि राज्य म्हणून पाहिलं तर याद्या मागण्याचा प्रश्न येणार नाही," असं संजय राऊत म्हणाले.


सध्याच्या वातावरणात रेल्वेमंत्र्यांची चीडचीड होणं स्वाभाविक
"रेल्वेमंत्री वाईट काम करतात असं आम्ही कधी म्हटलेलं नाही. आम्हाला अपेक्षित गाड्या मिळाल्या नाहीत. त्या मिळाल्या असत्या तर कदाचित स्थलांतरित मजूर लवकर त्यांच्या गावाला पोहोचले असते. एवढीच भूमिका राज्य सरकारने घेतल्यानंतर पियुष गोयल यांनी थोडी चीड व्यक्त केली. सध्याचं वातावरण पाहता चीडचीड होणं स्वाभाविक आहे. महाराष्ट्र सरकारने लाखो मजुरांना आपापल्या गावाला पाठवलं आहे," असं संजय राऊत म्हणाले.


शरद पवार-राज्यपाल भेटीवर मिश्किल टिप्पणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनीच या भेटीचं निमंत्रण दिलं होतं असतं कळतं. या भेटीबाबत विचारलं असतं संजय राऊत यांनी मिश्किल उत्तर दिलं. ते म्हणाले की, "राजभवन असा परिसर आहे जिथे एकदा गेलं की पुन्हा पुन्हा जावंसं वाटतं. निसर्गरम्य आहे, वास्तुकला उत्तमरित्या जपलं आहे. बाजूला समुद्र आहे, मोरांचे थवे नाचत असतात, नारळाची झाडं आहे. हे सगळं मुंबईमधल्या आमच्या लोकांना पाहता येत नाही. एखादे राज्यपाल चांगले असले, मायाळू असले तर ते आमच्यासारख्यांना चहापानासाठी बोलावतात. तेवढंच आम्हाला निसर्ग दर्शन होतं. राज्यपालांशी चर्चा होते. राज्यपाल चर्चेसाठी बोलावतात. एखाद्या घटनेवर टीका करणं म्हणजे त्या माणसाशी संपर्क ठेवू नये हे चुकीचं आहे. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये सुसंवाद ठेवावा लागतो आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे."


मुख्यमंत्री शिवसेनेचा, सरकार महाविकासआघाडीचं
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यात ते राज्यात आमचं नाही शिवसेनेचं सरकार आहे, असं म्हणत आहेत. याविषयी विचारलं असता संजय राऊत यांनी उत्तर दिलं की, "सरकार महाविकास आघाडीचं आहे आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. राजकीय परंपरा असते की आघाडीत ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो त्याच्या नावाने सरकारची ओळख असते.


VIDEO | नागपूर-उधमपूर ट्रेनसाठी कुठली यादी घेतली होती?; संजय राऊत यांचं रेल्वेमंत्र्यांना प्रत्युत्तर