मुंबई : वांद्र्यातील गर्दी प्रकरणात सर्वात मोठा गुन्हेगार कोण असेल तर रेल्वे मंत्रालय आहे, सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट लिहिल्या ते आहेत. रेल्वे मंत्रालयावरही महाराष्ट्र सरकारने किंवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना वांद्रे सत्र न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यानंतर संजय राऊत यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत राहुल कुलकर्णी यांना जामीन मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
Bandra Incident | एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना वांद्रे गर्दी प्रकरणी जामीन मंजूर
संजय राऊत म्हणाले की, "राहुल कुलकर्णींना जामीन मिळाला याचा आनंद आहे. पत्रकारांवर अटकेची वेळ येऊ नये. देश किंवा राज्य चालवण्यासाठी सरकार आणि मीडिया ही दोन चाकं आहे त्यांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे. पत्रकार चुकत असतील तर ज्येष्ठ राजकारण्यांना कान धरण्याचा अधिकार आहे. जेव्हा सरकार चुकत असेल तेव्हा पत्रकारांनी आपलं कर्तव्य बजावायला हवं असं मानणाऱ्यातला मी आहे. पत्रकाराला अटक करणं ही दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्रात यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी दोन्ही बाजूंनी सतर्क राहायला हवं. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलीय त्यामुळे राजकारण झालं की नाही यावर मी भाष्य करणार नाही. मी आज सामनाच्या अग्रलेखात स्पष्टपणे म्हटलं आहे वांद्र्यात जी गर्दी उसळली आणि जी कारवाई झाली तर त्यात सर्वात मोठं अपराधी कोण असेल तर रेल्वे मंत्रालय, सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट लिहिल्या ते आहेत. रेल्वे मंत्रालयावरही महाराष्ट्र सरकारने किंवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यानंतर वांद्र्यातल्या घटनेचा फायदा घेऊन काही पत्रकार, राजकीय पक्षाचे नेते, ज्यांनी धार्मिक चिथावणीखोर पोस्ट टाकल्या, त्यांच्यावरही कारवाई व्हावी असं माझं मत आहे."
ISupportRahulKulkarni | पत्रकाराला अटक करणं दुर्दैवी, राहुल कुलकर्णी यांना जामीन मिळाल्याचा आनंद : संजय राऊत
#ISupportRahulKulkarni | कोर्टाने पोलिस कस्टडी नाकारली, एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना जामीन