मुंबई : स्वच्छ भारतची घोषणा करणं आणि प्रत्यक्षात भारत स्वच्छ करणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असा टोमणा मारत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देवनार कचरा प्रश्नावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.


 
नागपूरनंतर मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी देवनार कचराभूमीला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अशोक चव्हाण, संजय निरुपम आणि काँग्रेसचे काही आमदार तसेच स्थानिक नेते उपस्थित होते.

 
देवनार कचराभूमीतील मोठ्या ढिगाऱ्याला 27 जानेवारीला आग लागली होती, तेव्हापासून ही आग धुमसतेच आहे. या प्रश्नावरुन काँग्रेसनं आता सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

 
देवनार दौऱ्यानंतर राहुल गांधींनी झवेरी बाजाराला भेट दिली आणि आपण सराफा व्यापाऱ्यांसोबत असल्याचं सांगत पाठिंबा दर्शवला. केंद्र सरकार व्यापाऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोपही यावेळी राहुल गांधींनी केला.