मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा प्रकोप हळू हळू कमी होऊ लागला आहे. यामुळं सरकारकडून काही ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. आता 15 ऑगस्टपासून मुंबई लोकलला देखील सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. मात्र यासाठी लसीचे दोन्ही डोस पूर्ण होणं गरजेचं आहे. यासाठी तसे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. लसीचे प्रमाणपत्र असलेल्यांनाच रेल्वे पास मिळणार आहे. आज आपण हा रेल्वे पास नेमका कसा काढायचा या बद्दल या लेखातून जाणून घेणार आहे


 रेल्वे पास कसा काढणार?



  • 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेले नागरिक आणि मास्क असा मंत्र लागू करत रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

  • रेल्वे प्रवासासाठी लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे. 

  • ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीनं रेल्वेचा पास काढता येणार आहे. 

  • पास काढण्याआधी  पाससाठीचा क्युआरकोड मिळवावा लागणार आहे

  • क्युआर कोड काढण्यासाठी तीन पद्धतींचा वापर करता येणार आहे. 


क्यूआर कोड कसा मिळवाल? 



  • ऑफलाईन


वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र दाखवून क्यूआर कोड मिळेल. हा क्युआर कोड तिकीट खिडकीवर दाखवून पास किंवा तिकीट मिळेल 



  • ऑनलाईन


बीएमसी प्रशासन आणि रेल्वे प्रशासन मिळून एक अॅप तयार करत आहे. पुढच्या दोन दिवसांत अॅप तयार होईल असं आयुक्तांनी सांगितलं आहे. या अॅपवर लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र अपलोड करुन क्युआर कोड मिळेल. हा क्युआर कोड तिकीट खिडकीवर दाखवून पास किंवा तिकीट मिळेल 



  • रेल्वे स्थानक


एमएमआर परिसरातील रेल्वे स्थानकांवरही लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र दाखवून क्यूआर कोड देण्याची व्यवस्था उभी केली जाईल. त्यासंदर्भात रेल्वे प्रशासनासोबत चर्चा सुरु आहे.


पात्र व्यक्तीच्या पात्र व्यक्तीच्या नावे जनरेट झालेला क्युआर कोड इतर ठिकाणीही प्रवेशासाठी वापरला जाऊ शकेल का याबाबत भविष्यात विचार केला जाणार आहे. कदाचित कोरोनासंकट असेपर्यंत अशाच पद्धतीने लसीचे दोन डोस घेतल्याता पुरावा दर्शवणा-या क्युआरकोड आधारेच प्रवेश दिला जाणार आहे.


संबंधित बातम्या :


लसीचं प्रमाणपत्र टी शर्टवर छापलं! लोकलनं प्रवास करायचाय तर 'हा' टी शर्ट घाला- फोटो होतोय व्हायरल


CM Uddhav Thackeray on Covid19: 15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार : मुख्यमंत्री