नवी मुंबई: नवी मुंबईतल्या पाळणाघर मारहाण प्रकरणी पूर्वा प्ले स्कूलची मालकीण प्रियंका निकमला अटक करण्यात आली आहे. प्रियंका निकम 20 दिवसांपासून फरार होती. कालच हायकोर्टानं प्रियंकाचा जामीन अर्ज फेटाळला होता.

प्रियंकाच्या पाळणाघरात 10 महिन्याच्या मुलीला मारहाण झाली होती. त्याप्रकरणी पाळणाघरची मालकीण प्रिंयका निकमवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.



काय आहे घटना?

खारघर सेक्टर 10 मध्ये पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरी आहे. या ठिकाणी काही चिमुकली पाळणाघरात आहेत. पाळणाघरातील आया अफसाना नासीर शेखने रितीशा नावाच्या दहा महिन्यां चिमुकलीला क्रूरपणे मारहाण केली होती. ज्यात मुलीच्या डोक्याला जखम झाली होती.

पाळणाघर प्रकरणात स्वत: लक्ष घालणार: पंकजा मुंडे

दरम्यान, पाळणाघरात चिमुकलीला करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणाविषयी मंत्री पंकजा मुंडेंनी संताप व्यक्त केला होता. ‘हा अतिशय घृणास्पद प्रकार आहे. हे पाळणाघर खासगी होतं की त्यासाठी त्यांनी कोणती परवानगी घेतली होती. याची चौकशी करण्यात येईल. तसेच इथं नियमांचं उल्लंघन झालं का याबाबतही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान संबंधित महिलेवर कडक कारवाई केली जाईल. तेथील पोलीस अधिकाऱ्यांशीही बोलून मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालणार आहे.’ अशी प्रतिक्रिया याप्रकरणी पंकजा मुंडेंनी दिली होती.