मुंबई : मुंबई पोलिसांच्या वर्दीवर हात टाकणा-या जोडप्याच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात काळबादेवी परिसरात एका ट्रॅफिक हवालदारावर एक महिला आणि तिच्या साथीदारानं केलेल्या हल्याची क्लीप सर्वांनीच सोशल मीडियावर पाहिली होती. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी आपलं आरोपपत्र मुंबई सत्र न्यायालयात सादर केलंय. आपलं कर्तव्य बजावणा-या एका सरकारी अधिका-यावर हल्ला करून त्याच्या कर्तव्यात बाधा आणल्याचा आरोप पोलिसांनी या आरोपपत्रातून केला आहे. त्यामुळे या आरोपांखाली दोषी आढळल्यास त्यांना पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते.


गेल्यावर्षी 23 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या काळबादेवीत घडलेली घटना अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली होती. ते प्रकरणं होतं आपलं कर्तव्य बजावणा-या एका ट्रॅफिक हवालदाराच्या वर्दीवर एका जोडप्यानं हात घातल्याचं. त्यादिवशी काळबादेवीच्या सुरती हॉटेल जंक्शनवर ड्युटीवर असणारे वाहतुक शाखेतील हवालदार एकनाथ पोरटे नेहमीप्रमाणे आपली ड्युटी करत होते. अचानक त्यांच्या दिशेनं येणारी एक दुचाकी त्यांनी अडवली. कारण ती चालवणा-या तरूणानं डोक्यावर हेल्मेट घातलं नव्हतं. मात्र अचानक 32 वर्षीय मोहसिन खान आणि त्याच्यासोबत असलेल्या 29 वर्षीय सागरिका तिवारी यांचा हवालदार पोरटेंसोबत वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, या दोघांनी थेट पोरटेंवर हल्ला चढवला आणि त्यांच्यावर धावून जात त्यांना शिवीगाळ सुरू केली. हा सारा प्रसंग उपस्थितांच्या मोबाईलमध्ये कैद झाला आणि ती क्लीप व्हायरल झाली. 


या घटनेनतंर या दोघांनाही अटक करण्यात आली होती. मात्र 26 ऑक्टोबर रोजी त्यांना दंडाधिकारी कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला होता. मुंबई पोलिसांनी या निर्णयला सत्र न्यायालयात आव्हान देत हा जामीन रद्द करण्याची मागणीही केली होती. मुंबई सत्र न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली होती. मात्र आपल्या निकालात नागरीकांनी त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नये असा शेरा मारला होता.


या संपूर्ण प्रसंगात आपलं कर्तव्य बजावणा-या एकनाथ पोरटे यांनी त्या हल्लेखोर महिलेविरोधात दाखवलेल्या संयमाचं बरंच कौतुक झालं होत. त्यानंतर तात्कालीन गृहमंत्र्यांनीही पोरटेंचा जातीनं सत्कारही केला होता. त्यामुळे थेट मुंबई पोलिसांवर केलेल्या हल्याचं हे प्रकरण पोलीस दलासाठी प्रतिष्ठेचा विषय झाला नसतं तरंच नवल होतं.