Sameer Wankhede : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वानखेडे यांच्यावर सीबीआयनं भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात इतर अनेक अधिकारी आणि खासगी लोकांचीही नावं आहेत. सीबीआयनं समीर वानखेडे यांच्या घरावर एक दिवस आधी छापा टाकला होता. आता यासंदर्भात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचं वक्तव्य समोर आलं आहे. देशभक्त असल्याची शिक्षा मिळत असल्याचं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. 


शुक्रवारी केंद्रीय अन्वेषण विभागानं समीरच्या मुंबईतील घरावर छापा टाकला आणि 13 तास चौकशी केली. वानखेडे 2021 पासून चर्चेत आहे, जेव्हा त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह काही जणांना मुंबईतील क्रूझवर अटक केली होती.


वडिलांसह सासरच्या घरीही सीबीआयची छापेमारी 


वानखेडे यांनी आज तकला आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "सीबीआयनं माझ्या निवासस्थानावर छापा टाकला आणि 12 तासांपेक्षा जास्त वेळ झडती घेतली. छापेमारीत 18 हजार रुपये आणि मालमत्तेसंदर्भातील काही कागदपत्रं सीबीआयकडून जप्त करण्यात आली. मी सेवेत रुजू होण्यापूर्वी ही मालमत्ता खरेदी केली होती. देशभक्त असल्याची शिक्षा मिळतेय." पुढे बोलताना ते म्हणाले की, सहा अधिकाऱ्यांच्या पथकानं अंधेरीतील माझ्या वडिलांच्या घरावर छापा टाकला आणि काहीही सापडलं नाही. सीबीआयच्या सात अधिकाऱ्यांच्या आणखी एका पथकानं माझ्या सासरच्या घरीही छापे टाकले. माझे सासूसासरे वृद्ध आहेत.


25 कोटींची लाच मागितल्याप्रकरणी FIR


आर्यन खानला ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणात अडकवू नये म्हणून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयनं समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात, लोकसेवकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7, 7A आणि 12 तसेच, भारतीय दंड संहितेच्या कलम 120B (गुन्हेगारी कट) आणि 388 (धमकीनं जबरदस्तीनं खंडणी) नुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
 
आर्यन खानला अटक केल्यानंतर समीर वानखेडी आले चर्चेत 


समीर वानखेडेनं 2 ऑक्टोबर 2021 रोजी कॉर्डेलिया क्रूझवर रेव्ह पार्टीदरम्यान छापा टाकला आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही अटक करण्यात आली. आर्यन खान 26 दिवस मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये होता. त्यानंतर आर्यन खानला जामीन मिळाला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sameer Wankhede Booked : सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्या घराची तब्बल 13 तास झाडाझडती, गुन्हाही दाखल