Sameer Wankhede Booked : एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या मुंबईतील निवासस्थानी सीबीआयने (CBI Raid) छापे टाकले. सोबतच सीबीआयने आर्यन खान (Aryan Khan) क्रूझ प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने त्यांच्या मुंबई, दिल्ली, रांची आणि कानपूरमधील एकूण 29 ठिकाणी छापेमारी केली.
समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीचे तत्कालीन अधीक्षक विश्व विजय सिंह, एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटचे तत्कालीन गुप्तचर अधिकारी आशिष रंजन, के.पी. गोसावी (खाजगी व्यक्ती), सॅनविले डिसोझा (खाजगी व्यक्ती) आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "संबंधित अधिकार्यांनी, व्यक्ती/इतरांकडून अवाजवी फायदा मिळवण्यासाठी, इतरांसोबत गुन्हेगारी कट रचला आणि कथित आरोपींकडून लाचेच्या स्वरुपात अवाजवी फायदा मिळवला," असा आरोप सीबीआयने केला आहे.
13 तास सीबीआयकडून झाडाझडती
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या गोरेगाव इथल्या इम्पिरियल हाईट्स इमारतीत असलेल्या घरी सीबीआय छापा टाकला. तब्बल 13 तास सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली. काल (12 मे) दुपारी साडे चार वाजता वानखेडे यांच्या घरी दाखल झालेले सीबीआयचे अधिकारी आज (13 मे) पहाटे साडेपाच वाजता बाहेर पडले. त्यांनी समीर वानखेडे यांच्या घरातील प्रिंटरसह काही इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स आणि काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
आर्यन खानला अटक, सुटका आणि समीर वानखेडेंवरील आरोप
समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वात ऑक्टोबर 2021 मध्ये एनसीबीने मुंबईतील एका क्रूझवर धाड टाकली होती. या धाडीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. हे प्रकरण संपूर्ण देशभरात गाजलं होतं. या कारवाईनंतर समीर वानखेडे देखील चर्चेत आले होते. त्यानंतर न्यायालयीन सुनावणी दरम्यान आर्यन खानची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली. यासोबतच न्यायालयाने समीर वानखेडेंच्या टीमवर जोरदार ताशेरे देखील ओढले होते.
समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, असा आरोप एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी केला होता. त्याच प्रकरणात आता सीबीआयने समीर वानखेडे यांच्या घरावर छापा टाकत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
समीर वानखेडे यांची चेन्नईत बदली
समीर वानखेडे हे एनसीबी मुंबईचे माजी प्रमुख होते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतपासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची प्रकरणे वानखेडे यांच्या कार्यकाळात समोर आली होती. यावेळी वानखेडे यांच्यावर काही गंभीर आरोपही करण्यात आले. जानेवारी 2022 मध्ये, मुंबईचे NCB प्रमुख समीर वानखेडे यांची बदली महसूल गुप्तचर संचालनालयात (DRI) करण्यात आली. यानंतर, मे 2022 मध्ये समीर वानखेडे यांची बदली डीआरआयमधून चेन्नई डीजी करदाता सेवा संचालनालयात झाली.
VIDEO : Sameer Wankhede CBI Raid : आयआरएस अधिकारी समीर वानखेडेंच्या घरी सीबीआयचं धाडसत्र : ABP Majha