कल्याण : डोंबिवलीत जीर्ण धोकादायक बनलेल्या पादचारी पुलाचा नागरिक सर्रासपणे वापर करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केलं जात आहे.
डोंबिवलीच्या गणेश मंदिराजवळ हा पूल असून तो डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडतो. जवळपास 30 ते 35 वर्ष जुना असलेला हा पूल अतिशय जीर्ण झालेला असून ठिकठिकाणी पुलाची अवस्था जर्जर झाली आहे. त्यामुळे रेल्वेनं काही दिवसांपूर्वी हा पूल पादचारी वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्याचे फलक याठिकाणी लावले आहेत.
याशिवाय पुलावरुन नागरिकांनी जाऊ नये, यासाठी पत्रेदेखील लावण्यात आले आहेत. मात्र याठिकाणी एकही सुरक्षारक्षक नसल्यानं नागरिकांकडून या पुलाचा वापर अव्याहतपणे सुरू आहे. अक्षरशः तारेवरची कसरत करून नागरिक या पुलावरून ये-जा करत असल्याचं सध्या पाहायला मिळतं आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतर रेल्वेचं याकडे लक्ष जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.