नालासोपारा: अवघ्या ७ हजार ६७५ रुपयांच्या थकबाकीसाठी नालासोपाऱ्यात एका ७० वर्षीय आजीबाईंना स्वतःच्याच घरात तीन तासांसाठी कोंडून ठेवण्यात आलं. वसई-विरार महापालिकेच्या या तालिबानी वसुलीविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे.
रोहणी क्षीरसागर, वय वर्ष ७०. दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर रोहिणी आपल्या मुलीकडे अनघा पोवळेकडे राहायला आल्या. सकाळी साडेदहाच्या सुमारास त्या बाथरुममध्ये गेल्या आणि बाहेर आल्यावर पाहतात तर काय त्यांना त्यांच्याच घरात कोंडण्यात आलं होतं.
नालासोपाऱ्यातील गौरव गार्डनमध्ये राहणाऱ्या अनघा पोवळे यांची वसई-विरार पालिकेकडे ७ हजार ६७५ रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. त्यासाठी तीन दिवसांपूर्वीच २० तारखेला त्यांना नोटीस मिळाली. त्यावर त्यांनी कोणतंही उत्तर देण्याच्या आत पालिकेच्या कंत्राटी कामगारांनी हे कृत्य केलं.
तब्बल तीन तासांनंतर या आजीबाईंची कोंडलेल्या घरातून सुटका झाली. मात्र, त्यांची भीती कमी झाली नव्हती. नोटीसीवर प्रत्युत्तर येण्याआधीच केलेली ही कारवाई सपशेल चुकीची असून संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य ती शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांची ही चूक आयुक्तांनी मान्य केली असली तरी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.