'दंगल'मधील राष्ट्रगीताला उभं न राहिल्याने मुंबईत प्रेक्षकाला चोप
एबीपी माझा वेब टीम | 23 Jan 2017 09:34 PM (IST)
मुंबई : 'दंगल' चित्रपटात राष्ट्रगीताच्या सीनला उभं न राहिल्यामुळे एका प्रेक्षकाला मारहाण झाल्याचं वृत्त आहे. मुंबईतल्या गोरेगावमधील एका चित्रपटगृहात 59 वर्षीय प्रेक्षकाच्या तोंडावर फटकावल्याची माहिती 'मिड डे' या वृत्तपत्राने दिली आहे. अमलराज दासन नावाचा प्रेक्षक गेल्या बुधवारी गोरेगावमधील एका थिएटरला 'दंगल' चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. चित्रपटातील एका सीनमध्ये राष्ट्रगीताची धून वाजते. मात्र या सीनच्या वेळी उभं न राहिल्याने एका प्रेक्षकाने अमलराज यांच्या तोंडावर फटकावल्याचं वृत्त आहे. चित्रपटात अभिनेता आमीर खानने कुस्तीवीर महावीर फोगाट यांची भूमिका साकारली आहे. महावीर यांची कन्या गीता फोगाट कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावते. त्यानंतर तिला पदक बहाल करताना पार्श्वभूमीला भारतीय राष्ट्रगीताची धून वाजते. त्यावेळी उभं न राहिल्याने हा वाद झाला. दरम्यान, आरोपी शिरीष मधुकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कलम 323 ( जाणूनबुजून दुखापत करणे) आणि 504 ( शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने मुद्दाम अवमान करणे) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही चित्रपटाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत सुरु असताना उभं न राहिल्याने प्रेक्षकांमध्ये वाद झाल्याची उदाहरणं पाहायला मिळाली आहेत.