मुंबई : हार्बर मार्गावरील लोकलचा खोळंबा ही नेहमीची परिस्थिती झाली आहे. किंबहुना, हार्बर सुरळीत आहे अशाच काहीशा बातम्या करण्याची वेळ आली आहे. हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन वेळेवर आल्याचं क्वचितच पाहायला मिळतं. हार्बर मार्गावरील प्रवाशांना हा मनस्ताप दररोजचा ठरलेला आहे. नवी मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवातच अनेकदा हार्बरच्या तांत्रिक बिघाडाने होते.


पनवेल ते सीएसएमटी या 68 किमीच्या मार्गावर एकूण 25 स्थानकं आहेत. मात्र सर्वात मोठा त्रास कुर्ला ते पनवेल या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागतो.

कुर्ला स्थानक हे मध्य रेल्वेवरील महत्वाचं स्थानक आहे. इथे सीएसएमटीहून आणि मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर घाटकोपरहून येणारे प्रवासी असतात. कुर्ला स्थानकातली 7 आणि 8 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरील गर्दी ही हार्बर मार्गावरची सर्वात भीषण समस्या आहे. इतर प्लॅटफॉर्म रिकामे असतानाही या प्लॅटफॉर्मवर गर्दी असते.

कुर्ला स्थानकात ठरलेल्या वेळेपेक्षा लोकल तीन मिनिटेही उशिरा आली, तरी गर्दीचं रुपांतर महागर्दीत होतं. संध्याकाळच्या वेळेला डाऊन मार्गावर प्रवास करताना अशा घटना नेहमी घडतात. त्यात हार्बरचा काही तांत्रिक बिघाड झाल्यास नवी मुंबईच्या प्रवाशांना बिघाड दुरुस्त होण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो. बऱ्याचदा पनवेल ते मानखुर्दपर्यंत गाडी सुरळीत येते, मात्र तिथून पुढे कुठे बिघाड होईल किंवा गती संथ होईल सांगता येत नाही. याचा प्रत्यय गेल्या काही आठवड्यांमधील घटनांतून आलाच आहे.

हार्बर मार्गावर केवळ स्लो गाड्या चालतात. फास्ट लाईन नसल्यामुळे सर्व भार याच मार्गावर असतो. त्यात हा नवी मुंबईला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. पण एवढी गर्दी आणि दुर्लक्षित मार्ग असल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. रेल्वे रुळाला तडे जाणं, ओव्हरहेड वायर तुटणं अशा तांत्रित समस्या अनेकदा उद्भवतात.

हार्बर मार्गावरील तुमच्या समस्या सांगा

तुम्ही जर हार्बर मार्गावरुन प्रवास करत असाल तर तुमच्या सुचना, समस्या आणि प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा. (कमेंट लिहिण्यासाठी स्क्रोल डाऊन करा)