मुंबई : राज्यात पश्चिम महाराष्ट्रासोबतच कोकणात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मुंबईहून सातारा, सांगली, कोल्हापूरकडे याशिवाय कोकणात आणि गोव्याकडे जाणाऱ्या सर्व खाजगी बस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना आपल्या गावी जाण्यासाठी कोणताच मार्ग उपलब्ध राहिलेला नाही. जोपर्यंत पूरस्थिती कमी होत नाही, रस्त्यावरील पाणी ओसरत नाही तोपर्यंत या गाड्या बंद राहतील, असं खाजगी बस मालक संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.


सोमवारपासून या गाड्या या सर्व मार्गावर बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठा तोटा खाजगी बस मालकांना सहन करावा लागतोय. प्रवश्यांची देखील यामुळे गैरसोय होत आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगलीला जाणाऱ्या गाड्या पुण्यापर्यंत चालवण्यात येत आहेत.

रोज किती खाजगी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत?

- मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोकण भागात जाणाऱ्या रोजच्या 100 खाजगी बस रद्द

- मुंबई ते कोल्हापूर, सातारा, सांगलीकडे जाणाऱ्या 300 गाड्या रद्द

- मुंबई ते बंगलोर, बेळगाव 300 गाड्या रद्द

- मुंबई ते गोवा 200 गाड्या रद्द