मुंबई : सांगली, कोल्हापुरसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. सोशल माध्यमांतून वेगवेगळ्या संस्था, संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर मदतीसाठी आवाहन केले जात आहे. या माध्यमातून मोठा मदतनिधी देखील उभा होत आहे. काल बारामतीमध्ये शरद पवारांच्या आवाहनानंतर बारामतीतून एक कोटींची मदत आणि अन्य साहित्य जमा केले आहे तर सिद्धीविनायक ट्रस्टकडूनही मदत केली जाणार आहे. पूरग्रस्तांसाठी मुंबईतील गणपती मंडळं पुढे येणार आहेत. गणेश उत्सवात भरमसाठ खर्च न करता मंडळांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करण्याचं आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून सर्व मंडळांना करण्यात आले आहे.


मुंबईतील अनेक गणेश मंडळं सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवतात.  यावर्षी पूरग्रस्तांसाठी पुढे येण्याचं आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केलं आहे.  गेले पाच दिवस आपल्या राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा येथे आलेल्या महापुराने  प्रचंड नुकसान झाले आहे. प्रसारमाध्यमांमधून आपल्याला महापुराने आलेल्या संकटाची जाणीव असेल.  या अस्मानी संकटात पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो लोकांचे स्थलांतर झाले असून त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती सर्व मंडळांना आवाहन करते की त्यांनी पुरग्रस्तांसाठी सढळ हस्ते मदत करावी. मंडळांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करून योगदान दयावे. पुरग्रस्तांप्रती आपुलकी दर्शवत यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सजावटीवर भरमसाठ खर्च करण्याऐवजी त्यातील बचत पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देऊन समाजात आदर्श निर्माण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पवारांच्या आवाहनानंतर पूरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची रोख मदत जमा
शरद पवारांच्या आवाहनानंतर पूरग्रस्तांसाठी बारामतीतून तब्बल एक कोटी रुपयांची रोख मदत जमा झाली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत काल बैठक झाली. या बैठकीला बारामती शहर आणि तालुक्यातील अनेक संस्था, पदाधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते. शरद पवार यांनी उपस्थितांना मदतीचं आवाहन केलं आणि अवघ्या अर्ध्या तासात 1 कोटी रुपये जमा झाले. या रकमेद्वारे पूरग्रस्तांना रोख रक्कम, अन्नधान्य,  कपडे आणि औषधांचा पुरवठा केला जाणार आहे.

 शिवसेना नगरसेवक एका महिन्याचं मानधन देणार, शिवसेना भवनात पूरग्रस्तांसाठी मदतनिधी केंद्र
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या नगरसेवकांना त्यांचं एक महिन्याचं मानधन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा आदेश दिला आहे. स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाकडून पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यात येत आहे. पण या मदतीत आता शिवसेनेनंही आपला वाटा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. दादरच्या शिवसेना भवनात पहिल्या मजल्यावर पूरग्रस्तांसाठी मदतनिधी केंद्र सुरु करण्यात आलं आहे.  निम्मा महाराष्ट्र महापुरामुळं संकटात सापडलेला असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल मातोश्रीवर पक्षप्रवेश करून घेण्यात आले. त्यामुळं शिवसेनेला टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्याच शिवसेनेला उशीरानं का होईना पण अखेर जाग आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या नगरसेवकांना त्यांचं एक महिन्याचं मानधन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा आदेश दिला आहे. स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाकडून पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यात येत आहे. पण या मदतीत आता शिवसेनेनंही आपला वाटा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. दादरच्या शिवसेना भवनात पहिल्या मजल्यावर पूरग्रस्तांसाठी मदतनिधी केंद्र सुरु करण्यात आलं आहे.

सिद्धिविनायक ट्रस्ट  धावून आलं
कोल्हापूर-सांगलीतल्या पूरग्रस्तांसाठी मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्ट अखेर धावून आलं आहे. पुरामुळे कोल्हापूर-सांगली, साताऱ्यात पिण्यासाठी कुठेच शुद्ध पाणी मिळत नाहीये. त्यामुळे सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे पूरग्रस्तांसाठी पाण्याच्या बाटल्या पाठवण्यात येणार आहेत. एका ट्रकमध्ये 10 हजार बाटल्या अशा एकूण 11 लाख शुद्ध पाण्याच्या बाटल्या देण्यात येणार आहेत.  कोल्हापूर, सातारा, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या बाटल्या सोपवल्या जातील. सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी ही माहिती दिली आहे.

महापुराचं थैमान कायम
सलग सहाव्या दिवशीही कोल्हापुरात महापुरानं घातलेलं थैमान कायम आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी पुराचं पाणी मात्र ओसरलेलं नाही. त्यामुळं कोल्हापूर, सांगली आणि कराडमधल्या नागरिकांना अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. दरम्यान सहाव्या दिवशीही हवाई दल, एनडीआरएफ यांच्याकडून बचावकार्य सुरु आहे. सांगलीमध्ये एनडीआरएफला लष्कराची मदत मिळाल्यानं रेस्क्यू ऑपरेशनला वेग आल्याचं बघायला मिळतंय. महापुराच अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरमधून फूड पॅकेट्स दिले जातायत. यासाठी लष्कराच्या 2 हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येतोय. सांगलीतही कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात घट झाली आहे.