मुंबई : ‘मागच्या कर्जमाफीत गोंधळ झाला असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर सरकार तुमचं आहे, चौकशी करुन तात्काळ कारवाई करा.' अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं आहे. दरम्यान, यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाणांनी कर्जमाफीवरुन भाजप सरकारवर बरीच टीका केली आहे.


‘मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीची मानसिकता नव्हती’

‘मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीची मानसिकता नव्हती. कर्जमाफीच्या घोळाचं खापर फक्त बँकांच्या डोक्यावर फोडून चालणार नाही.’ अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र डागलं आहे. ते मुंबईत बोलत होते.

‘सर्व यंत्रणांचं संचालन करण्याचं काम सरकारचं आहे. त्यामुळे बँका आणि सरकारी खात्यांकडे टोलवाटोलवी करून उपयोग नाही.’ असंही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.

‘सरकार तुमचं आहे, तात्काळ चौकशी करा’

‘मागच्या कर्जमाफीत गोंधळ झाला असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर सरकार तुमचं आहे, चौकशी करून कोणाला तरी शिक्षा करा. नुसतं साप म्हणून रुई थोपटायची आणि वातावरण गडूळ करायचं बंद करा. जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करा.’ असं थेट आव्हान अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

‘13 लाख खाती बोगस होती का?’  

बँकांनी आधी 89 लाख शेतकऱ्यांचा आकडा सांगितला आणि प्रत्यक्षात नोंदणीनंतर 13 लाख खाती कमी झाली. गायब झालेली खाती बोगस होती का? ती सरकारी बँकांची होती का, राष्ट्रीयकृत बँकांची होती? हे सरकारनं स्पष्ट करावं. अशी मागणी यावेळी चव्हाण यांनी केली.

‘मुख्यमंत्र्यांनी संघाची खासगी यंत्रणा आणली आहे’

मुख्यमंत्र्यांनी आरएसएसची खासगी यंत्रणा आणून बसवली आहे. त्यांची कार्यकक्षा काय आहे? त्यांना भरगच्च पगार दिले जातात. यामुळे सरकरी आणि खासगी अधिकारी यांच्यात सुप्त संघर्ष

सुरू आहे. ज्याची शिक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळते आहे. असंही चव्हाण यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या :

कर्जमाफीच्या घोळाची पीएमओकडून गंभीर दखल

कर्जमाफीचे पैसे वाटण्यास अखेर सुरुवात!

राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जमाफीचे आकडे फुगवून सांगितले : अजित पवार

राज्याची आर्थिक स्थिती बिकट, कर्जाची सर्वोच्च मर्यादा गाठली