मुंबई : मुंबईतील मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर लोखंडी रॉडनं हल्ला केल्यानं ते गंभीर जखमी झाले आहेत.

माळवदे यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर  उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मालाडला रवाना झाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

मालाडचे मनसे विभागअध्यक्ष सुशांत माळवदे आणि काही कार्यकर्त्ये हे आज (शनिवार) दुपारी 3.30च्या दरम्यान मालाड रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत की नाही याची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अचानक फेरीवाल्यांच्या जमावानं माळवदे आणि त्यांच्यासोबतच्या चार ते पाच कार्यकर्त्यांवर थेट हल्ला चढवला.

यावेळी माळवदे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला. ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं.

दरम्यान, संजय निरुपम यांनी चिथावणी दिल्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे.