मुंबई: भाजप सरकाने मोठा गाजावाजा केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा देशातील इतर राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातही बोजवारा उडाला आहे. सरासरीनुसार 91 टक्के युवकांना 23 हजार 30 रूपये कर्ज दिले असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे. एवढ्याशा रकमेत चहाची टपरी किंवा पकोडा तळण्याचा उद्योगही उभा राहू शकत नाही, असा टोलाही सावंत यांनी मारला आहे.
राज्य सरकारतर्फे जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 1 कोटी 19 लाख तरूणांना एकूण 59 हजार 746 कोटी रूपयांचे कर्ज या योजनेअंतर्गत वाटण्यात आले आहे.
मुद्रा योजनेअंतर्गत ‘शिशु’ वर्गासाठी 50हजार रूपयांपर्यंत कर्ज दिले जाते. ‘किशोर’ वर्गात 50 हजार ते 5 लाख रूपयांपर्यंत कर्ज दिले जाते तर तरूण या वर्गात 5 लाख ते 10 लाख रूपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे.
यावर सचिन सावंत यांनी सांगितले की, 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत म्हणजेच सरकारने चार वर्षाचा कालावधी पूर्ण करेपर्यंत मुद्रा योजनेच्या वेबसाईटवर असलेल्या आकडेवारीनुसार सरकारने जाहीर केलेल्या आकड्यापेक्षा अधिक म्हणजेच 1 कोटी 23 लाख 36 हजार 917 जणांना कर्जाचे वाटप झाले आहे.
परंतु यामध्ये एकूण 1 कोटी 12 लाख 7 हजार 258 जणांना म्हणजेच एकूण 90.84 टक्के लोकांना शिशु या वर्गातच कर्ज दिले गेले आहे. ज्याची रक्कम सरासरी 23 हजार 30 रूपये आहे. तसेच केवळ 7.17 टक्के लोकांना सरासरी 2 लाख 10 हजार 736 रूपये कर्ज मिळाले आहे.
सरकार दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तरूणांना रोजगार देण्याऐवजी मोठमोठ्या घोषणा, फसव्या जाहिराती, अतिरंजीत व खोटे आकडे दाखवून त्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.