मुंबई : एकीकडे ऑक्सिजन सिलेंडरची विक्री महागली असताना आता ऑक्सिजन मशीनच्या भाड्यात देखील तिप्पटीने वाढ झाली आहे. ऑक्सिजन मशीन आणि सिलेंडरची विक्री तसेच या वस्तू भाड्याने देणाऱ्या व्यवसायिकांनी ऑक्सिजन मशीनच्या किंमती तब्बल 25 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. सध्या कोरोना निगेटिव्ह होऊन गेलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडत असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरीच ऑक्सिजन घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अनेकजण ऑक्सिजन सिलेंडर किंवा ऑक्सिजन मशीन विकत घेत आहेत. याचाच गैरफायदा उठवण्याचं काम व्यावसायिकांनी केल्याचं पाहिला मिळतंय. कोरोनापूर्वी चिनी कंपन्यांच्या मशीनचे दर 27 ते 35 हजार होते आता ते दर 38 ते 45 हजारांपर्यत गेले आहेत. तर ब्रँडेड कंपन्यांचे दर 47 हजार ते 1 लोकांपर्यत होते ते आता 70 हजार ते सव्वा लाखांपर्यत पोहचले आहेत.


रुग्णांची ही लूट थांबवण्यासाठी आता ऑल फूड अँड ड्रग्ज असोसिएशनने पाऊल उचललं असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अभय पांडे यांनी दिली आहे. याबाबत बोलताना राज गोसर म्हणाले की, माझे नातेवाईक काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेतं होते. यावेळी त्यांना ऑक्सिजनची गरज असल्यामुळे आयसीयू वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. ज्यावेळी ते बरे झाले त्यावेळी देखील त्यांना श्वसनाचा त्रास होतं असल्यामुळे त्यांना घरी देखील काही दिवस ऑक्सिजनची सुविधा करावी लागेल असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे आम्ही मागील काही दिवसांपासून त्यांना भाड्याने सिलेंडर उपलब्ध करून ऑक्सिजन देत आहोत.


राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची रेकॉर्ड ब्रेक नोंद, एका दिवसात 32 हजार रुग्णांना डिस्चार्ज


महिनाभरापूर्वी आम्हाला सिलेंडर 500 रुपयांमध्ये उपलब्ध होत होता. आता मात्र यामध्ये 25 टक्के वाढ करण्यात आली आहे. आमच्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. जर अशा पद्धतीने जीवन जगण्यासाठी आवश्यक ऑक्सिजन घेण्यासाठीच त्यांना जास्तीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असेल तर मग त्यांनी आता जगायचं तरी कसं असा सवाल उपस्थित होतं आहे.


याबाबत अधिकची माहिती देताना ऑल फूड अँड ड्रग्ज असोसिएशनचे अध्यक्ष अभय पांडे म्हणाले की, सध्या कोरोनामुळे सर्व सामान्य नागरिक हैराण झाला आहे. त्यात आशा पद्धतीने सर्व सामान्य नागरिकांची लूट होणार असेल तर नक्कीच हे निषेधार्ह आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ काहीतरी ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.


Covid OPD | महाराष्ट्रातील पहिली पोस्ट कोव्हिड ओपीडी, दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांवर उपचार!