Presidential Election 2022 :  भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. यंदा एनडीएकडून द्रौपदी मूर्म आणिा युपीएकडून यशवंत सिन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मू यांना विक्रमी मते मिळणार असल्याचा विश्वास भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला. पक्षमर्यादा झिडकारुन आज द्रोपदी मुर्मु यांच्या समर्थनात मतदान होईल असे सूचक वक्तव्य ही त्यांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


आज होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी विधीमंडळातील सेंट्रल हॉलमध्ये मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपचे आमदार ट्रायडंट हॉटेलमधून विधानभवनात दाखल झाले आहेत. रविवारी ट्रायडंट हॉटेलमध्ये या आमदारांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत मतदान कसे करायचे याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना मार्गदर्शन केले होते. 


आज सकाळी माध्यमांशी बोलताना भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितले की, आम्हाला महाविकास आघाडीचे अस्तित्व दिसत नाही. महाराष्ट्रातून एनडीएच्या उमेदवारास मोठ्या संख्येनं मतदान होईल. तो आणखी एक राजकीय इतिहास ठरणार आहे. राज्यसभा, विधानसभा निवडणूकीत काय झालं ते राज्याने पाहिलं आहे. पक्षमर्यादा झिडकारुन आज द्रोपदी मुर्मु यांच्या समर्थनात मतदान होईल असे सूचक वक्तव्य शेलार यांनी केले. 


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. भाजपनं राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या रुपात आदिवासी चेहरा दिला आहे. राष्ट्रपतीपदासाठी मतदान करणाऱ्या जवळपास 60 टक्के जणांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा आहे. त्यामुळं साहजिकच त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. आज मतदान झाल्यानंतर निकाल 21 जुलै रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर 25 जुलै रोजा नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल. 


असं आहे मतांचं गणित


राष्ट्रपती निवडणुकीत एकूण 4809 मतदार, मतांचं एकूण मूल्य 10 लाख 86 हजार 431 


लोकसभा आणि राज्यसभेचे 776 खासदार मतदार, खासदारांच्या मतांचं एकूण मूल्य 5 लाख 43 हजार 200


सर्व राज्यांतील 4033 आमदार मतदार, प्रत्येक राज्यात मतांचं मूल्य  वेगवेगळं


विविध राज्यांतील आमदारांच्या मतांचं  एकूण मूल्य 5 लाख 43 हजार 231


सध्याचं चित्र पाहता एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड