मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने उद्योजक नेस वाडियाला मोठा दिलासा दिला आहे. अभिनेत्री प्रीती झिंटानं नेस वाडियांविरोधात दाखल केलेला विनयभंगाचा एफआयआर रद्द करण्याचा आदेश हायकोर्टानं दिला आहे. न्यायमूर्ती रणजीत मोरे यांच्या चेंबरमध्ये बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता ही सुनावणी झाली.


प्रीती झिंटा आणि नेस वाडिया हे दोघेही या सुनावणीसाठी दालनात हजर होते. 2014 साली आयपीएल सामन्यादरम्यान नेसनं विनयभंग केल्याचा प्रीतीचा आरोप होता. प्रीतीच्या तक्रारीवरून या प्रकरणातील गुन्हा रद्द करण्यासाठी नेसनं हायकोर्टात धाव घेतली होती.

नेमक्या कोणत्या कारणामुळे हा गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. दोन्ही बाजूच्या वकिलांनीही नेसनं माफी मागितली की नाही हे सांगण्यास कोर्टाने मनाई केली असल्याचं सुनावणीनंतर बाहेर आल्यावर सांगितलं. त्यामुळे नेसनं माफी मागितली की नाही हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

नेसनं माफी मागण्याची तयारी दाखवली तर आपण केस मागे घेऊ, असं प्रीतीच्या वतीनं हायकोर्टाला गेल्या सुनावणीवेळी सांगण्यात आलं होतं. तर नेसनं मात्र माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांचे वकील आभात फोंडा यांनी म्हटलं होतं. या सगळ्या प्रकरणातून प्रीती झिंटा केवळ मीडियाचं लक्ष वेधण्याच्या प्रयत्नात असल्याचा आभात फोंडा यांनी केला होता. मात्र आम्ही लेखी माफीची अपेक्षाच करत नाही, असं प्रीतीच्या वकिलांनी स्पष्ट केलं होतं. यावर झालं तेवढ पुरे झालं आता हे प्रकरण समोपचारानं मिटवा असं मत व्यक्त केलं होतं.

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिनं चार वर्षांपूर्वी उद्योजक मित्र नेस वाडिया याच्या विरोधात  दाखल केलेल्या विनयभंगाच्या आरोप प्रकरणी मुंबई पोलिसांनी 200 पानी आरोपपत्र मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट इस्प्लानेड कोर्टात दाखल केलं होतं. आयपीसी कलम 354 म्हणजे हल्ला करणं, कलम 503 गुन्हेगारी स्वरुपाचा त्रास देणं, कलम 509 विनयभंग करणे या कलमांअतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. आरोपपत्र दाखल करण्यात आलं त्यावेळी नेस कोर्टात हजर होता. त्याला 20 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आलं. त्यानंतर खटला सुरू होण्याआधीच नेस वाडियानं आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव होती.

30 मे 2014 रोजी पंजाब एलेव्हन किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांदरम्यान आयपीएल सामना सुरु असताना प्रीती झिंटाला वानखेडे मैदानाच्या गरवारे पॅव्हेलियनमध्ये बसलेलं पाहून वाडिया यांनी तिकीट वाटपावरुन आपल्या टीमच्या कर्मचाऱ्यांना सर्वांदेखत शिवीगाळ केली. त्यानंतर प्रीतीनं आपली जागा बदलली. पण त्यानं नेसचं समाधान झालं नाही. त्यांनी सगळ्या टीम सदस्यांच्यादेखत आपल्याला शिवीगाळ आणि असभ्य वर्तन केलं असा आरोप प्रीतीनं केला आहे. तसेच, आपले हात जोरात खेचत आपल्यावर नेसनं हल्ला केला असा आरोप प्रीतीनं केला होता. नेसनं मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले होते.

2005 ते 2010 दरम्यान प्रीती आणि नेस एकमेकांना डेट करत होते. पण 2010 साली ते वेगळे झाले. पण त्यानंतरही त्यांची मैत्री कायम आहे. आयपीएलमधल्या किंग्स इलेव्हन पंजाब या संघाचे संयुक्त मालक आहेत.