मुंबई : मोठ्या प्रतीक्षेनंतर वरुणराजा मुंबईत दाखल झाला आहे. हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. मुंबई उपनगरासह नवी मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीतही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या.


मुंबई उपनगरात गेल्या अर्ध्या तासापासून जोरदार पाऊस बरसू लागला आहे. उपनगरातील मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, गोवंडी परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली.

मुंबईत संध्याकाळी अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी बरसू लागल्या. अचानक आलेल्या या पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली. गेले काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना या पावसामुळे दिलासा देखील मिळाला आहे.

दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. महाबळेश्वरला सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीला पूर आला. तर इतर भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.