मुंबई : मुंबईतील मलबार हिलमधील बंगल्यावरुन आता मुंबई महापालिका आणि राज्य सरकारमध्ये जुंपली आहे. शासनाने आदेश दिले तर दुसऱ्या क्षणाला बंगला रिकामा करु, असं उत्तर एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी दिलं.


राज्य सरकारच्या बंगल्यात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल राहतात. त्यामुळे मला मलबार हिलमधील महापालिकेचा बंगला अलॉट करण्यात आला. जर सरकारनं सांगितलं, तर एका मिनिटात बंगला रिकामा करु, असं उत्तर प्रवीण दराडे यांनी दिलं.

मलबार हिलचा बंगला पालिका महापौरांसाठी काढून घेणारच!


सध्या दादरमध्ये असलेलं महापौर निवास बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला दिल्यानंतर मलबार हिलचा बंगला आपल्याला मिळावा, अशी महाडेश्वरांची इच्छा आहे. त्यामुळे मलबार हिल येथील जल अभियंत्याचा बंगला ताब्यात घेण्यासाठी पालिकेचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

राहिले दूर घर माझे, मलबार हिलचा बंगला महापौरांना नाही?


मलबार हिलच्या बंगल्याला असलेली महापालिकेची सुरक्षा व्यवस्थाही काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अधिभार लावून पाणी, वीज देयके वसूल करण्यात येणार आहे. आतापर्यंत पल्लवी दराडे, प्रविण दराडे यांच्या ताब्यातील बंगल्यासाठी मेंटेनन्सचा खर्च महापालिका करत होती, मात्र यापुढे तो करणार नाही, अशी कठोर भूमिका गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आली.

काय आहे प्रकरण?

मुंबई महापौरांचा बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जाणार आहे. त्यामुळे पालिकेला महापौरांना पर्यायी निवासस्थानची व्यवस्था करावी लागणार आहे. भायखळा येथील राणी बागेतील बंगला महापौरांनी नाकारला होता.

मलबार हिल येथील पालिकेच्या जल अभियंत्यांच्या बंगल्याचा पर्याय सुचविण्यात आला. मात्र मलबार हिल येथील पालिकेच्या बंगल्यात सनदी अधिकारी राहत आहेत. त्यामुळे हा बंगला रिकामा करण्यास अडथळे येत आहेत. भाजप वगळता शिवसेनेसह विरोधकांनी बंगला रिकामा करण्याची जोरदार मागणी लावून धरली होती.