मुंबई : सुकाणू समितीत उभी फूट पडली असताना, दुसरीकडे या बैठकीवेळी समितीच्या एकमेव महिला सदस्या प्रतिभा शिंदे यांना रडू कोसळल्याची बातमी काही माध्यमांनी दिली. पण अशा बातम्या म्हणजे, निव्वळ अफवा असून, सुकाणू समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आज सुकाणू समितीची बैठक मुंबईतील शेकापच्या कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीत सुकाणू समितीतील एकमेव महिला प्रतिनिधी प्रतिभा शिंदेंना बोलू दिलं नाही. त्यामुळे शिंदेंना रडू कोसळल्याच्या बातम्या दिल्या होत्या. मात्र अशा बातम्या म्हणजे निव्वळ अफवा असून सुकाणू समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघात प्रतिभा शिंदेंनी केला.
प्रतिभा शिंदे म्हणाल्या की, ''राज्यातल्या शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन सुकाणू समितीची आजची बैठक झाली. या बैठकीत मुद्द्यांवर चर्चा झाली. मी 21 वर्ष चळवळीमध्ये काम केलेली महिला आहे. मला जर बोलू दिलं नाही, तर माझे मुद्दे संघटनेसमोर मांडण्यासाठी सक्षम आहे. पण माध्यमांमध्ये अशा बातम्या कुणी पसरवत असेल, तर आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे.''
दरम्यान, मोठ्या वादानंतर सुरु झालेल्या सुकाणू समितीमधील मतभेद बैठकीनंतरही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. राजू शेट्टींच्या नेतृत्वात उद्या उच्चस्तरीय मंत्रिगटाची चर्चा करणार असं समितीनं जाहीर केल्यानंतर लगेच रघुनाथ पाटील यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. मंत्रिगटाशी चर्चा करायला फक्त निवडक सदस्य जाणार नाहीत तर सर्वच्या सर्व 35 सदस्य जातील असं रघुनाथ पाटलांनी सांगितलं. मात्र शेकापचे आमदार आणि सुकाणू समितीतील सदस्य जयंत पाटील यांनी रघुनाथ दादा उशीरा आले, असं सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
संबंधित बातम्या
'मागण्या मान्य न झाल्यास मध्य प्रदेशप्रमाणे आंदोलन करु'
सुकाणू समितीमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर
...तर मी सुकाणू समितीतून बाहेर पडण्यास तयार : राजू शेट्टी
शेतकरी नेत्यांच्या सुकाणू समितीत उभी फूट