ठाणे : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद करण्यात आलेली संस्कृती युवा प्रतिष्ठानची प्रसिद्ध दहीहंडी यंदा रद्द करण्यात आली आहे. या दहीहंडी आयोजनाचा सर्व खर्च कोरोनासाठी वापरणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषद घेऊन आमदार प्रताप सरनाईक यांची दिली. या सोबत दरवर्षी प्रो कबड्डीचे आयोजन देखील करण्यात येते. प्रो कबड्डीद्वारे जे पथक जिंकेल त्याला पैशांच्या स्वरूपात बक्षिसे दिले जातात. यावर्षी ते देखील रद्द करण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले. याबदल्यात होणारा सर्व खर्च कोरोनाच्या उपचारासाठी देणार आहेत. तसेच घरो घरी जाऊन 1 कोटीच्या औषधांचे वाटप करण्यात येईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनासाठी लागणाऱ्या रुग्णवाहिका मीरा भाईंदर आणि ठाण्यात देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.


सार्वजनिक उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. गणपतीनंतर सर्वात मोठा महाराष्ट्रातला उत्सव म्हणजे दहीहंडी असतो. त्यातही ठाण्यात अनेक मोठ्या दहीहंडी यांचे आयोजन करण्यात येते. मुंबई आणि आसपासच्या परिसरातून हजारो पथके या दहीहंडीसाठी ठाण्यात येतात. संस्कृती प्रतिष्ठानची हंडी ही महाराष्ट्रातील जुनी आणि सर्वात मोठ्या हंडीपैकी एक. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ही आयोजित करतात, अनेक मोठे सेलेब्रिटी या हंडीला हजेरी लावतात. मात्र ती या वर्षी रद्द करण्यात आली आहे. इतर आयोजकांनी देखील असेच करावे, असे आवाहन आमदार सरनाईक यांनी केले आहे.


दहीहंडी उत्सवासाठी मोठमोठी पारितोषिके देण्यात येतात. या रक्कमाही मोठ्या असतात. मात्र, हा सण साजरा करताना मोठ्या प्रमाणावर तरुण गोविंदा एकत्र येतात. थर लावताना देखील एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे शक्य नसते. तसेच बघ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात असते. जर गोविंदा उत्सवात गर्दी झाली, तर सध्या सरकार करत असलेल्या उपाययोजना फोल ठरण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करून आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार यंदा संस्कृती प्रतिष्ठानची हंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला असून विविध प्रकारची पारितोषिके तसेच इतर नियोजनापोटी होणारा खर्च कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका तसेच इतर उपाययोजनांसाठी वापरणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.


तसेच लूट करणाऱ्या खाजगी रुग्णालयावर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालिका स्थरावर मीरा भाईंदर आणि ठाणे महापालिका कडे केली असल्याची आमदार प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली.


संबंधित बातम्या :