मुंबई :  यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचं नवा आदर्श निर्माण करावा,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केले आहे. मुख्यमंत्री यांनी आज आगामी गणेशोत्सवातील कायदा, सुव्यवस्था संदर्भात व्हिसीद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, राज्यमंत्री सतेज पाटील व राज्यमंत्री शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, राज्यभरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.


पुणे व इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे,याबद्दल तसेच शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे अशी ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले.


आपण राज्यात पुनःश्च हरि ओम करून प्रत्येक पाऊल सावधतेने टाकत आहोत. परंपरा खंडित होणार नाही याची काळजी आपण घेऊ पण उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावे लागेल. जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव आपण साजरा करू, यासाठी कार्यक्रम निश्चित करून आपण हा सण साजरा करू असे मुख्यमंत्री म्हणाले. गणेश मंडळांच्या मार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल याचा आपण विचार करू व हा उत्सव साजरा करू. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.


सामाजिक बंधने पळून अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याबाबत सर्वांचे एकमत झाले. राज्य शासनाकडून आगामी काळात येणाऱ्या नियमावलीप्रमाणे उत्सव साजरा करूया, असे आश्वासन सर्वच गणेश मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिले.


संबंधित बातम्या :




Chintamani Ganesha | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आमगन सोहळा रद्द, गणेश मूर्ती मंडपातच साकारणार