मुंबई: सैनिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, ही मागणी शिवसेनेसह विरोधी पक्षांनी आजही लावून धरली.

दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिचारकांबाबत सरकारने आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली.

त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिचारक हे विधानपरिषदेचे सदस्य असल्याने, त्यांच्याबाबत त्या सभागृहात निर्णय होईल. तो निर्णय विधानसभेत कळवला जाईल, असं सांगितलं. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा प्रश्न उपस्थित करत, परिचारक यांनी सभागृहात नव्हे तर बाहेर वक्तव्य केल्याने त्यावर सरकारने भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे, असं म्हटलं.

मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिचारकांचं वक्तव्य निषेधार्ह आहेच, त्याबाबत कारवाई व्हावी असं म्हटलं.

त्यानंतर मग पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं.

शिवसेनेचं वॉकआऊट

दरम्यान, प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, ही मागणी शिवसेनेने लावून धरली. या मागणीबाबत विचार न झाल्याने, शिवसेनेच्या काही आमदारांनी सभागृहातून बाहेर पडणं पसंत केलं.

परिचारकांचं निलंबन मागे घेतल्याने वाद

जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने प्रशांत परिचारक यांचं दीड वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर चौकशीसाठी समिती नियुक्ती करण्यात आली होती. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर या समितीचे अध्यक्ष होते. या समितीने 28 फेब्रुवारीला आपला अहवाल सभागृहात ठेवला. प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घ्यावं, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली होती. हा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला.

परिचारक यांचं निलंबन मागे घेतल्याने, सत्ताधारी शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत, त्यांचं निलंबन कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रशांत परिचारक यांची सभा होती.  सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसेमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत, विरोधकांवर टीका करण्याच्या नादात भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांचा घोर अपमान केला होता.

“पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे, ” असं वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केलं होतं.

संबंधित बातम्या

आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे

 परिचारकांबाबत विरोधकांसह शिवसेनेचा दुतोंडीपणा उघड

अखेर प्रशांत परिचारक दीड वर्षासाठी निलंबित! 

..तोपर्यंत परिचारकांना निलंबित करु : चंद्रकांत पाटील

परिचारकांचं निलंबन करा, विधानपरिषदेत सर्वपक्षीयांची मागणी

सैनिकांबद्दल अपशब्द काढणाऱ्या आमदाराला ठोकणार : उदयनराजे

आमदार प्रशांत परिचारक यांची प्रचार सभेत जीभ घसरली

‘ते’ वक्तव्य अनवधानानं निघालं’, परिचारकांचा माफीनामा