एमपी मिल कंपाऊंड प्रकरणात प्रकाश मेहतांचा कारभार पारदर्शी नाही, असा लोकायुक्तांचा अहवाल सादर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावर प्रकाश मेहतांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “अहवाल आला आणि त्यात माझ्या विरोधात काही लिहिलेलं असेल, हे खरं असेल तरच यावर मी भाष्य करु शकेन” असं म्हणत सूत्रांची माहिती किती खरी हे तपासावं लागेल असंही प्रकाश मेहतांनी ‘माझा’शी बोलताना स्पष्ट केलं.
आता विरोधी पक्षांना काही काम उरलेलं नाही. विरोधी पक्षांनी आधी सूत्रांची माहिती पक्की करावी मग आपली भूमिका बजावावी. फक्त विरोधासाठी विरोध करणे त्यांना शोभा देत नाही असं म्हणत विरोधकांवरही जोरदार टीका केली आहे.
विरोधकांसारखी आमच्या पक्षात संस्कृती नाही. पक्षावर संशय करणं म्हणजे मी स्वतःवर संशय करण्यासारखं आहे, असंही मेहता पुढे म्हणाले. दरम्यान या प्रकरणात मुख्यमंत्री आणि पक्ष जो निर्णय घेतील तो मान्य असेल असंही प्रकाश मेहतांनी स्पष्ट केलं आहे.
लोकायुक्तांचा नेमका ठपका काय?
एमपी मिल कंपाऊंड प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत लोकयुक्तांनी एम. एल. तहलियानी यांनी ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणात प्रकाश मेहतांचा कारभार पारदर्शी नाही, असा लोकायुक्तांचा अहवाल सादर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच लोकायुक्तांचा हा अहवाल आणि त्यावर राज्य सरकारने केलेली कारवाई हा मुद्दा आगामी पावसाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय लागू होण्याआधीच त्याला स्थगिती दिली. मात्र या निर्णय प्रक्रियेत आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन विकासकाच्या फायद्यासाठी मंत्रीमहोदयांनी निर्णय घेतल्याचं मतही लोकायुक्तांनी व्यक्त केलं आहे. "मुख्यंत्र्यांना याबाबतची कल्पना नव्हती, फाईलवर चुकून तसा शेरा मारण्यात आला," अशी कबुली प्रकाश मेहता यांनी लोकायुक्तांकडे दिली आहे.
प्रकाश मेहतांवर आरोप काय?
मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर करण्यात आला होता. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप आहे.
3K च्या नियमात एका विकासकाला फायदा देण्यासाठी धोरण ठरवता येत नसल्याचं कारण सांगत गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी प्रस्तावाला विरोध केला होता. तसंच पीएपी (प्रकल्पबाधितांची घरं) संदर्भातही प्रस्तावावरही त्यांनी प्रतिकूल शेरा मारला होता. पण मेहता यांनी ही फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता.
संबंधित बातम्या :
एमपी मिल प्रकरणात मुख्यमंत्री चौकशीला सामोरे जाणार : सूत्र
प्रकाश मेहतांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करणार : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांचा पारदर्शक कारभार कुठे आहे?: धनंजय मुंडे
सुभाष देसाईंनी 400 एकर जमीन बिल्डरच्या खिशात घातली : धनंजय मुंडे
विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा देणार नाही : प्रकाश मेहता
मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री
‘माझा’च्या बातम्यांवर सभागृहात घमासान, प्रकाश मेहता-मोपलवारांना हटवण्याची मागणी
मुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश