मुंबई : नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपींची पोलीस कोठडी क्राईम ब्रांचला देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तपास यंत्रणेला जेल कोठडीतच चौकशी करावी लागणार आहे. शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी तीन दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आरोपींचा ताबा क्राईम ब्रांचकडे देण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. आज (गुरूवारी) दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चौकशीसाठी ताबा दिला जाईल, असेही न्यायलयाने स्पष्ट केले आहे.


"या प्रकरणातील आरोपी हे पेशाने डॉक्टर आहेत, याचे भान ठेवा. सुरूवातीलाच या प्रकरणाचा तपास योग्य अधिकाऱ्यांकडे का दिला नाही?" असा सवाल करत न्यायमूर्ती एस. शिंदे यांनी राज्य सरकारची ही मागणी फोटाळून लावली आहे.

नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी पुढील तपासासाठी तीनही आरोपी महिला डॉक्टरांची दोन दिवसांची पोलीस कोठडी हवी. ताब्यात घेतल्यापासून, "आम्ही काहीही केले नाही" इतकेच उत्तर त्यांच्याकडून मिळत आहे. त्यामुळे जेल कोठडीत योग्य पद्धतीने चौकशी होणार नाही. अशी मागणी करत मुंबई क्राईम ब्रांचने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. परंतु आरोपीच्या वकिलांचा याला विरोध होता. तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत, परंतु जेल कोठडीतच दिवसभर चौकशी करावी अशी आरोपींची मागणी होती.

दरम्यान आरोपींचे वकील आभात पोंडा यांनी कोर्टाला माहीती दिली आहे की, पायल तडवींवर आरोपींनी कधीही वर्णद्वेशी शेरेबाजी केली नाही, "प्रसुतीगृहातील रुग्णांच्या ब्लडप्रेशरची (रक्तदाबाची) चुकीची नोंद केल्याबद्दल प्रसंगी तिला दम दिला होता". परंतु ही चूक वारंवार तिच्याकडून होत होती आणि दरवेळी पायल, "मी थकले आहे", असे कारण द्यायची. तेव्हा स्टाफच्या खासगी वॉट्सअॅप ग्रुपवर तिला स्वत:ची जबाबदारी टाळल्याबद्दल 'भगौडी' असे म्हटल्याची माहीती दिली. सोमवारी मुंबई सत्र न्यायालयात डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.