मुंबई : वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली आहे. मग आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेची बी टीम आहे, असं का बोलत नाही, असा प्रश्न बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी विचारला. प्रकाश आंबेडकर एबीपी माझाच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत बोलत होते.


महाविकाआघाडीचं सरकार 5 वर्ष टिकावं. शिवसेना प्रामाणिक होती, कारण भाजपपासून आम्ही का वेगळं होत आहोत याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र काँग्रेस महाविकास आघाडीत का सामील झाली ते त्यांनी स्पष्ट करावं. राष्ट्रवादी शिवसेनेसोबत गेली ते आम्ही समजू शकतो, त्यांची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसने मात्र कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राज्यातील काँग्रेस नेते देखील याबाबत का बोलत नाहीत? अशी विचारणा प्रकाश आंबेडकरांनी केली.


लोकसभा, विधानसभा निवडणुकांपूर्वी मीडियाने, विचारवंतांनी वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम ठरवलं होतं. आता काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत जाऊन सत्ता स्थापन केली आहे. मात्र आता मीडिया आणि विचारवंत काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेची बी टीम, असं का म्हणत नाहीत.


बारामतीतील एका मुलाखतीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तीन महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की, राष्ट्रवादी भाजपबरोबर जाणार हे ठरलं होतं. मग राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये नेमकं काय बिनसलं हे देखील भाजपने सांगावं असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. भाजपकडून जोपर्यंत काही स्पष्ट होत नाही, तोपर्यंत भाजपही सत्ताधारी पक्षाचा एक भाग आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा रस्त्यावरील एकमेव विरोधी पक्ष आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.