मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या दक्षिण मुंबईतील पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतील रहिवासी संघटनांचा दक्षिण मुंबईतील बाळासाहेबांच्या पुतळ्याला विरोध आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा दक्षिण मुंबईत नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) समोर, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटावर उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र दक्षिण मुंबईतील जागतिक वारसा असलेल्या या ठिकाणी बाळासाहेबांचा पुतळा उभारण्यात येऊ नये, असे पत्र दक्षिण मुंबईतील काही संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
फेडरेशन ऑफ रेसिडेंट ट्रस्ट (फोर्ट) या संघटनेने यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. या शिखर संघटनेत ओव्हल कुपरेज रेसिडेंट असोसिएशन (ओसीआरए), नरिमन पॉइंट चर्चगेट सिटीझन असोसिएशन (एनपीसीसीए) आणि ओव्हल ट्रस्टचा समावेश आहे.
दक्षिण मुंबईत बाळासाहेबांचा पुतळा का नको?
येथे पुतळा उभारल्यास येथील वाहतूक नियमनात अडथळे येतील, असे या संघटनांचे म्हणणे आहे, यासाठी पर्यायी जागा शोधावी. पर्यायी जागा मिळत नसेल तर पुतळ्याच्या उंचीबाबत पुनर्विचार करावा, अशी त्यांची मागणी आहे.
या ठिकाणी लालबहादूर शास्त्रींचाही पुतळा आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा लालबहादूर शास्त्रींच्या पुतळ्यापेक्षा मोठा असू नये अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
पत्रानुसार, दक्षिण मुंबईत जेथे बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार आहे; ते ठिकाण युनेस्को जागतिक वारशांच्या यादीत येते. परिणामी मुख्यमंत्र्यांनी पुतळ्यासाठी पर्यायी जागा शोधावी, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.
येथूनच गेट वे ऑफ इंडियाकडे मार्ग जात असून, येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. या कारणाने येथे पुतळा उभारण्यात येऊ नये, असेही पत्रात नमूद आहे.
पुतळ्याची जागा, उंची आणि यामुळे वाहतुकीच्या नियमनावर लक्ष ठेवण्यास अडथळे येतील, असे संघटनेचे म्हणणे आहे.
याआधी बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या निर्णयाबाबत काय काय झालं?
याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मारकावरुनही वाद झाले होते. आता त्यांचा दक्षिण मुंबईत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुतळाही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
याआधी बाळासाहेबांचा पुतळा गेट वे ऑफ इंडियाजवळ रिगल सिनेमासमोरील वाहतूक बेटावर बसवण्यात येणार होता. मात्र, नियोजित जागा अपुरी पडल्यानं पुन्हा पुतळ्याची जागा बदलुन ती नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) समोर, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटावर निश्चित करण्यात आली.
आता रहिवासी संघटनांच्या विरोधामुळे ही जागा पुन्हा बदलली जाईल का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या दक्षिण मुंबईतील पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण पुन्हा लांबणीवर?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Dec 2019 04:10 PM (IST)
याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मारकावरुनही वाद झाले होते. आता त्यांचा दक्षिण मुंबईत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुतळाही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -