Prabhakar Sail Death Drugs Case Updates :  आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पंच प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला आहे. प्रभाकर साईल यांचा मृत्यूमागे घातपाताची शक्यता व्यक्त करत राष्ट्रवादीनं सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे की, कार्डिलिया ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने फर्जीवाडा करुन केलेल्या कारवाईतील एनसीबीचा पंच आणि एनसीबीचा फर्जीवाडा प्रतिज्ञापत्राद्वारे उघड करणारा प्रभाकर साईल याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी आहे मात्र या मृत्यूमागे घातपाताची शक्यता असून राज्यसरकारने या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे.


कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टीतील एनसीबीचा फर्जीवाडा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देशासमोर आणला होता. एनसीबीचा तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे कशा फर्जी कारवाई करतो हे पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेत सिद्ध केले होते. त्यामुळे केंद्रीय एजन्सी असलेल्या एनसीबीची देशभर नाचक्की झाली होती असेही महेश तपासे म्हणाले. 


महेश तपासे यांनी म्हटलं आहे की, समीर वानखेडे याच्या टीममध्ये फर्जी अधिकारी के. पी. गोसावी आणि इतर सहा जणांना नवाब मलिक यांनी समोर आणत त्यांचं भाजप कनेक्शन कसं आहे याचे पुरावे माध्यमांना पत्रकार परिषदेत देत एनसीबीची पोलखोल केली होती. 


तपासे यांनी म्हटलं आहे की, फर्जी अधिकारी के. पी. गोसावी याचा बॉडीगार्ड आणि ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने नवाब मलिक यांनी फर्जीवाडा समोर आणल्यानंतर ही कारवाई कशी फर्जी होते हे समोर आणले होते. मात्र आज त्याचा अचानक हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे वृत्त आले आहे.


आर्यन खान प्रकरणात एनसीबीने परवाच कोर्टाकडे चार्जशीट दाखल करण्यासाठी 90 दिवसाची मुदत मागितली होती मात्र कोर्टाने 60 दिवसात चार्जशीट दाखल करा असे आदेश दिले होते आणि आज मुख्य साक्षीदाराचा मृत्यू होतो यामागे नक्कीच काहीतरी दडलं आहे त्यामुळे याची कसून चौकशी झाली पाहिजे असेही महेश तपासे म्हणाले.


प्रभाकर साईलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू 


प्रभाकर साईलचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला. प्रभाकर साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड होता.  


कोण होते प्रभाकर साईल?
क्रुझ कारवाई प्रकरणातील प्रथम क्रमांकाचे नाव असणारे पंच
साईल हा पंच  किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड  
किरण गोसावींकडेच याची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha