Sada Sarvankar Inquiry : गणेश विसर्जनाच्या (Ganpati Visarjan) दिवशी मुंबईतील (Mumbai) प्रभादेवी इथे झालेल्या राड्या (Prabhadevi Rada) प्रकरणात शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. सदा सरवणकर यांची दादर पोलीस ठाण्यात (Dadar Police Station) चौकशी होणार आहे. परंतु सदा सरवणकर या आठवड्यात कधीही पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहू शकतात, अशी माहिती समोर येत आहे.
सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळी झाडल्याचं सिद्ध
मागील वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील प्रभादेवी परिसरात शिवसेना (उद्धव गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात वाद झाला होता. या दरम्यान आमदार सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सरवणकर यांची बंदूक बॅलेस्टिक तपासणीसाठी एफएसएलकडे पाठवली होती, त्यात त्या दिवशी त्यांच्याच बंदुकीतून गोळी झाडल्याचे सिद्ध झालं होतं. या संदर्भात पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.
याआधी दोन वेळा सरवणकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं
या प्रकरणी दादर पोलिसांनी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार सदासरवणकर यांना चौकशीसाठी बोलावले. दरम्यान दादर पोलिसांनी याआधी सदा सरवणकर यांना दोन वेळा चौकशीसाठी बोलावले होते, मात्र ते पोलीस ठाण्यात उपस्थित राहिलेच नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या आठवड्यात कोणत्याही दिवशी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहू शकतो, असं सदा सरवणकर यांनी पोलिसांना सांगितल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
वादाचं नेमकं कारण काय?
गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. मात्र, या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील आपला मंच उभारला होता. या मंचावरुन शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनीनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द वापरले. त्यामुळे दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची देखील झाली. या वादाचे रुपांतर मध्यरात्रीतील राड्यात झाले. शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले. दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत (Mahesh Sawant) यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तूलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला.
संबंधित बातमी
अडचणी वाढणार? 'ती' गोळी सदा सरवणकरांच्याच बंदुकीतूनच सुटली; बॅलेस्टिक अहवालातून स्पष्ट