CM Government Plane : मुख्यमंत्री एकथान शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शासकीय विमानात (Government Plane) पुन्हा एकदा बिघाड झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री संजय राठोड हे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील कार्यक्रमात जात असतानाच हा बिघाड झाला. विमान टेक ऑफ करतानाच तांत्रिक बिघाड झाला. या विमानाच्या दुरुस्तीचं काम सुरु असून सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संजय राठोड हे मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) प्रतीक्षा करत आहेत.
जळगाव जिल्ह्यात अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्या वतीने महाकुंभांचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाकुंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राठोड शासकीय विमानातून जळगावच्या दिशेने रवाना होणार होते. परंतु तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सध्या सर्व जण मुंबई विमानतळावर विमान दुरुस्त होण्याची प्रतीक्षा करत आहेत. जळगावातील कार्यक्रम महत्त्वाचा आहे. मुंबई ते जळगाव हे अंतर फार असल्यामुळे ते रस्ते मार्गाने गेले तरी कार्यक्रमाला पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
शासकीय विमानात बिघाड होण्याची महिन्यातील दुसरी वेळ
महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय विमानात बिघाड होण्याची या महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. याआधी 5 जानेवारी रोजी या विमानात बिघाड झाला होता. एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे औरंगाबाद आणि पुण्याच्या दौऱ्यावर जाणार होते. पण त्याचवेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने शिंदे आणि फडणवीस या दोघांनाही एअरपोर्टच्या व्हीआयपी वेटिंग रुममध्ये थांबावं लागलं. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दोघांनाही जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ ताटकळावं लागलं. तरीही विमान दुरुस्त होऊ न शकल्याने आणि दुरुस्तीसाठी वेळ लागणार असल्याचे समजल्यावकर मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री हे आपल्या मतदारसंघात म्हणजेच ठाण्याच्या दिशेने निघाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कारने पुण्याला गेले.
बंजारा समाजाच्या वतीने जळगावात महाकुंभ
देशभरातील संतांच्या मार्गदर्शनामध्ये बंजारा समाज बांधवांची एकजूट व्हावी, व्यसनापासून तरुणांनी दूर राहावं तसेच बंजारा समाजाचे धर्मांतरण रोखण्यासाठी अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून जामनेर तालुक्यातील गोदरी येथे महाकुंभाचे आयोजन करण्यात आलं आहे. आज या महाकुंभाचा समारोप होणार आहे. या महाकुंभाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, योगगुरु रामदेव बाबा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.