ठाणे : अवघ्या काही दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करून खुल्या करण्यात आलेल्या मुंब्रा बायपासवर जुने खड्डे तसेच सोडून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या नावाखाली अर्धवट कामं करणाऱ्या यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली जात आहे.


ठाण्यापलीकडील शहरांना ठाणे आणि मुंबईशी जोडणाऱ्या या प्रमुख रस्त्याची काही दिवसांपूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती. पावसाळ्याच्या आधीपासून दुरुस्तीच्या नावाखाली हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. मात्र दुरुस्तीमध्ये बायपासवरील निवडक भाग सोडला, तर सगळीकडे जुने आणि खड्डेमय रस्ते कायम असल्याचं चित्र आहे.


त्यामुळे एमएसआरडीसी आणि ठेकेदाराने इतक्या दिवसात दुरुस्तीच्या नावाखाली केलं तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यात भरधाव वेगात येणारी वाहनं जोरात आदळत आहेत.


या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सगळ्याबाबत एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता, काही कामं बाकी असून ती युद्धपातळीवर पूर्ण केली जात असल्याचं ते म्हणाले. मात्र कामं जर अर्धवट होती, तर बायपासचं उद्घाटन करण्याची घाई का करण्यात आली? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.