बस-कार अपघातात भाजपच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 27 Aug 2018 11:36 PM (IST)
भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष गुरुनाथ वामन लसने यांचा बस आणि कारच्या अपघातात जागीच मृत्यू झाला.
भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर बस आणि वॅगन आर कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात भाजप नेत्याला प्राण गमवावे लागले. भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष गुरुनाथ वामन लसने यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. गुरुनाथ लसने आपल्या कारने भिवंडीहून घराच्या दिशेने निघाले होते. मुंबई-नाशिक महामार्गावरील सरावली पाडा भागातून जाताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या खाजगी बसचालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस दुभाजक तोडून लसनेंच्या कारवर आदळली. बसची जोरदार धडक बसल्यावर कार आणि बस रस्त्यालगत असलेल्या खोलगट भागात जाऊन आदळल्या. या भीषण अपघातात गुरुनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. खाजगी बसमधील 15 ते 20 प्रवासी बचावले. घटनेची माहिती मिळताच कोनगाव पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. लसने यांचा मृतदेह भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना नेण्यात आला. या अपघाताची नोंद कोनगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.