मुंबई : दीड वर्षाच्या पेंग्विनने राणीच्या बागेत प्राण सोडला आणि आता त्याच्या मरणाची चिकीत्सा सुरु झाली आहे. दक्षिण कोरियावरुन आयात केलेल्या पेंग्विनच्या मृत्यूची हळहळ व्यक्त करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची स्पर्धा सुरु झाली आहे. स्थायी समितीतही आज ही चढाओढ पाहायला मिळाली.

मैं पेंग्विन को श्रद्धांजली देती हुँ... उसके लिये शोकप्रस्ताव की मांग रखती हूँ
- वकारुन्नीसा अन्सारी, काँग्रेस

पेंग्विन को स्ट्रेस था...अत्यंतिक तनाव से वो मर गया हैं
- रईस शेख, समाजवादी पक्ष

पेंग्विनला पनवती लागु नये म्हणून लिंबु मिरची फंड आणा
- संतोष धुरी, मनसे

दूरदेशाहून मुंबईत आलेल्या या दीड वर्षाच्या पाहुण्यानं मुंबईतच जीव सोडला. तिकडे बर्फात, पाण्यात मनसोक्त खेळणारा पेंग्विन काही महिने इथल्या काही फुटांच्या चौकटीत पोहला...थकला...आणि जीवानिशी गेला. त्याच पेंग्विनच्या जीवावर आता राजकारण सुरु आहे.

आपल्याकडे दरवर्षी कुपोषणानं मुलं दगावतात... शेकडो मुंबईकरांनी प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मधल्या जागेत मृत्यू येतो. पण या सर्वांपेक्षा या पेंग्विनचा मृत्यू महत्वाचा आहे. कारण त्याच्या मृत्यूची वेळ राजकिय पक्षांसाठी मुंबईतच्या नव्या राजकारणाचा मुहूर्त ठरली आहे.

कुणी कोट्यवधी रुपये खर्चून आणलेल्या या पेंग्विनसाठी शोकसभा भरवा अशी मागणी केली, तर कुणी पेंग्विनच्या ताणतणावाचं मोजमाप करा अशी मागणी केली. रोज बीपी, हार्ट अटॅकचे नवे पेशंट तयार करणाऱ्या, माणसाला कणाकणानं मारणाऱ्या या शहरानं पेंग्विनवरही आपली जादू केली तर..

पेंग्विन मेला, नवे रस्ते खड्डे पडून मेले, मोकळी मैदानं, उद्यानं त्यावरचा कचरा कुजून मेले...या सगळ्यालाच एकाएकी पनवती लागली असं म्हटलं जात आहे. या पनवती लागण्यावरही स्थायी समितीत आता जालीम उपाय सुचवला जात आहे.

पण, पेंग्विनची बाकीची भावंडं अजून जिवंत आहेत. त्यांच्या जीवाला मात्र डोळ्यांत तेल घालून जपलं जातंय. त्यांच्यासाठी स्पेशल किचन, स्पेशल स्विमींग टँक काय काय म्हणून विचारु नका...शेवटी लाखोंच्या संख्येनं असलेल्या मुंबईकरांपेक्षा हे पेंग्विनचे जीव लाखमोलाचे नाहीत का???

बाकी कोण काय नशिब घेऊन जन्माला येईल सांगता येत नाही... या आलिशान जागेत पोहणाऱ्या, सगळं काही रेडीमेड असणाऱ्या पेंग्विनचा लोकलमध्ये धक्काबुक्की करतांना हेवा वाटेल. कदाचित...पण, कुणास ठाऊक त्या मुक्या जिवाच्या मनात काय आहे...शेवटी जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

संबंधित बातम्या :


पेंग्विन मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची होर्डिंगबाजी


एक पेंग्विन गेला, आता राणीच्या बागेत दुसरा पेंग्विन


राणीच्या बागेतील एका मादी पेंग्विनचा जिवाणू संसर्गामुळे मृत्यू


बालहट्टामुळे एका पेंग्विनचा मृत्यू, नितेश राणेंचा निशाणा


पनवती लोकांकडून पेंग्विनबाबत टीका : उद्धव ठाकरे