मुंबई : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. नवी दिल्लीतील चाणक्यपुरी इथल्या प्रायमस रुग्णालयात गुरुदास कामत यांनी अखेरचा श्वास घेतला.
सोनिया गांधी आणि पर्यायाने गांधी कुटुंबीयांच्या अत्यंत जवळचे असलेले गुरुदास कामत, यांनी मुंबईसह महाराष्ट्रात काँग्रेस वाढीसाठी मोलाची भूमिका बजावली.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेला एक सर्वसामान्य तरुण देशाच्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचतो.... असा राजकीय क्षेत्रातील अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा असा गुरुदास कामत यांचा प्रवास आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक समित्यांवरील पदं भूषवली, राजकीय क्षेत्रातही मोठ-मोठ्या जाबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.
गुरुदास कामत यांचा राजकीय प्रवास:
1980 मध्ये गुरुदास कामत यांची महाराष्ट्र प्रदेश यूथ काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. 1984 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश यूथ काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. मग 1987 मध्ये त्यांची भारतीय यूथ काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. गुरुदास कामत हे 2003 मध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 2008 पर्यंत त्यांनी हे पद भूषवलं.
- 1972 साली विद्यार्थी चळवळीतून राजकीय क्षेत्रात प्रवेश
- 1976 साली एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
- 1984 साली पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर
- पाच वेळा ईशान्य मुंबईमधून लोकसभेत प्रतिनिधित्व
- 2009 ते 2011 यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम
- केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचाही अतिरिक्त कारभार
- 2014 मध्ये शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांकडून कामतांचा पराभव
गुरुदास कामत यांचा शैक्षणिक प्रवास
गुरुदास कामत यांचं शालेय शिक्षण कुर्ल्यातील होली क्रॉस स्कूलमध्ये झालं. त्यानंतर कॉमर्स शाखेसाठी माटुंग्यातील पोद्दार कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ते शिक्षणात अत्यंत हुशार विद्यार्थी होते. 1996 साली पोतदार कॉलेजकडून सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारा ‘प्रो. वेलिंगकर ट्रॉफी’ पुरस्कार देण्यात आला होता.
पोद्दार कॉलेजमध्ये असताना ते बॅडमिंटन टीमचे नेतृत्त्व करत, तसेच जिमखान्याचे सेक्रेटरीही होते. 1975-76 साली गुरुदास कामत यांची पोतदार कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी थेट निवड झाली होती.
त्यानंतर गुरुदास कामत यांनी मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेमध्ये प्रवेश घेतला. तिथेही ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय राहिले. गव्हर्नमेंट लॉ कॉलजच्या विद्यार्थी संघटनेच्या सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली. अभ्यासातही ते प्रचंड हुशार होते. गव्हर्नमेंट लॉ कॉलेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावून, मुंबई विद्यापीठात द्वितीय आले होते.
समित्यांवरील भूषवलेली पदे :
1984 – 1989 – सदस्य, सल्लागार समिती, रसायन आणि खते मंत्रालय
1987 - 1989 – सदस्य, रेल्वे बिलासंबंधित संयुक्त समिती
1991 – 1996
सदस्य, औद्योगिक समिती
सदस्य, रेल्वे संमेलन समिती
सदस्य, सल्लागार समिती, रसायन आणि खते मंत्रालय
1998 – 1999
सदस्य, याचिका समिती
सदस्य, पेट्रोलियम आणि केमिकल समिती
सदस्य, सल्लागार समिती, अर्थ मंत्रालय
2004 - 2009
अध्यक्ष. ऊर्जेवरील स्थायी समिती
सदस्य, सल्लागार समिती, पेट्रोलियम अँड नॅशरल गॅस मंत्रालय
सदस्य, अधिकृत भाषा समिती
सदस्य, अर्थ समिती
2005 – 2009
सदस्य, प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया
विद्यार्थी चळवळ ते केंद्रीय मंत्री, गुरुदास कामत यांचा प्रवास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Aug 2018 09:38 AM (IST)
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेला एक सर्वसामान्य तरुण देशाच्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचतो.... असा राजकीय क्षेत्रातील अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा असा गुरुदास कामत यांचा प्रवास आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -