मुंबई : देशभरात सुप्रीम कोर्टात लागू केलेल्या फटाकेबंदीची नागरिकांनी ऐशीतैशी केल्याचं आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने दिसून आलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये फटाके वाजवण्याची वेळ रात्री 8 ते 10 असताना अनेक जणांनी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्तावरच आतषबाजीला सुरुवात केली.

मुंबईतल्या बहुतांशी भागांमध्ये वेळेआधीच लोकांनी फटाके फोडले. विशेष म्हणजे मरिन ड्राईव्हवर पोलिसांचा बंदोबस्त असल्याने आठच्या आधी कुणी फटाके फोडले नाहीत, मात्र दहा वाजून गेल्यानंतरही मुंबईकरांचा फटाके फोडून जल्लोष सुरुच होता.



सर्वसामान्यांप्रमाणे नेते मंडळींनीही दिवाळीचा सण साजरा केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली, तर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीही कसबा पेठेतल्या राहत्या घरी दिवाळी सेलिब्रेट केली.

संजय राऊत यांनी कोर्टाचे नियम धुडकावत कुटुंबासह फुल टू दिवाळी सेलिब्रेशन केलं. हिंदूंचे सण आले का निर्बंध येतात, असं म्हणत राऊत त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत 'आठ ते दहा'च्या मर्यादेशिवाय फटाके फोडले. 2019 च्या निवडणुकीत कोणाच्या फटाक्याचा आवाज जास्त असेल, कुणाचा फुसका बार आहे, राऊत आणि बापट या दोघांनीही खुमासदार उत्तरं दिली.

महापालिकेच्या कामांतून सवड काढत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही कुटुंबीयांसोबत वेळ घालवला. महापौरांनी आपल्या घरी कंदील लावला. तर त्यांच्या पत्नीने घरात सुंदर रांगोळीही काढली.