मनसेच्या अमेय खोपकरांना पोलिसांची नोटीस
वेदांत नेब, एबीपी माझा | 15 Mar 2017 12:40 PM (IST)
मुंबई : दादरमधील शिवाजी पार्क परिसरात ढोलताशे वाजवल्याने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. शिवाजी पार्कवर शिवजयंतीनिमित्त ढोलताशे वाजवल्यामुळे पोलिसांनी खोपकरांना नोटीस पाठवली. शिवाजी पार्क या शांतता घोषित परिसरात ढोलताशे वाजवून परिसराची शांतता भंग केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सकाळी 9.30 वाजल्यापासून शिवाजी पार्क परिसरात ढोल-ताशांचा गजर सुरु होता. शिवजयंतीनिमित्त शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली जाणार होती. मनसेने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. “मी या नोटिशीला घाबरत नाही. अशा अनेक नोटिसा मला आल्या आहेत. सरकारला ही नोटीस पाठवताना काहीतरी वाटायला हवं. तुम्ही शिवजयंतीला अशी नोटीस पाठवता?”, असे म्हणत अमेय खोपकर यांनी सरकारवर टीका केली.