मुंबई : मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचे तेरावे मुख्यमंत्री म्हणून मंगळवारी (14 मार्च) शपथ घेतली. पर्रिकरांना 16 मार्च रोजी बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. परंतु गोव्यात सत्ता स्थापन केल्याने शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गोव्यात लोकशाहीचा खून झाल्याची टीका शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून करण्यात आली आहे.


गोवा विधानसभेत 17 जागांसह काँग्रेस मोठा असूनही भाजपने प्रादेशिक पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. सेटिंग करुनही निवडून आलेल्या भाजपच्या 13 आमदारांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी लायक उमेदवार मिळणं  कठीणच होतं. त्यामुळे पर्रिकरांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यात आलं, असा टोला शिवसेनेने लगावला.

काय म्हटलंय 'सामना'त?
काँग्रेस सुस्त राहिली म्हणून भाजपविरोधात निवडून आलेले पक्ष भाजपच्याच घोडेबाजारात सामील झाले आणि बुधवारी मुख्यमंत्री पर्रीकर यांचा शपथविधीही पार पडला. सत्तेसाठी गोव्यात जी राजकीय धुळवड खेळली गेली तिला लोकशाहीचा खून याशिवाय वेगळे काही म्हणता येणार नाही. अर्थात, लोकशाहीचा असा खून गोव्यात अनेकदा झाला आहे. त्यात आणखी एका खुनाची भर पडली. खून पचवायची शक्ती आमच्या लोकशाहीला मिळो. मनोहर पर्रीकरांना आमच्या शुभेच्छा!