भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील पारसनाथ कंपाऊंडमध्ये एचपी, कॅनॉन, सॅमसंग, व इपसॉन या नामवंत इलेक्ट्रॉनिक कंपन्यांच्या वस्तूंचे बनावट पॅकेजिंग केले जाते. त्यासाठी वापरले जाणारे सुमारे 25 कोटींहून अधिक रक्कमेचे पुठ्ठ्याचे साहित्य (बनावट वेष्टन) पोलिसांनी छापा घालून जप्त केले आहे. तसेच पोलिसांनी या छाप्यावेळी एका आरोपीला अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. किशोर आंबा बेरा (28) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
संबंधित गोदामात अनधिकृतपणे पॅकेजिंग साहित्य ठेवण्यात आले असल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी नारपोली पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी छापा टाकून सदरचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान आरोपींवर कॉपिराईट अॅक्ट 1957 चे कलम 51 आणि कलम 63 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कॉपिराईट अॅक्ट अन्वये करण्यात आलेली ही देशातील मोठ्या कारवायांपैकी एक कारवाई असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान या पकेजिंग बॉक्सचा वापर ऑनलाइन विक्रीसाठी होतो का? तसेच या गुन्ह्यामध्ये अजून कोण सहभागी आहेत? पोलीस याचा तपास करत आहेत.
व्हिडीओ पाहा