मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या गैरव्यहरप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक आणि एचडीआयएल विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.


पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, चेअरमन वरियम सिंग व बँकेचे इतर पदाधिकारी तसेच एचडीआयएल कंपनीचे संचालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरबीआयकडून सजबीर मठा यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला.




काय आहे प्रकरण?


2008 ते 2019 या कालावधीत भांडूपमधील पीएमसी बँकेतील ज्या खात्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज देण्यात आलं होतं आणि ज्यांची परतफेड होत नव्हती, त्या खात्यांची माहिती आरबीआयपासून लपवण्यात आली होती. तसेच या खात्यांची खोटी कागदपत्रे बनवून आरबीआयला देऊन दिशाभूल करण्यात आली. यामध्ये बँकेचे 4355.46 कोटी रुपयांचे नुकसान झाले.


हा गैरव्यवहार करण्यात हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. ग्रुप ऑफ कंपनीचा पुढकार होता. त्यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन संगनमत करुन कट रचला होता. कर्जाची परतफेड न करता कर्ज रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत बँकेची फसवणूक करण्यात आली. आरोपींविरोधात कलम 409, 420, 465, 466, 471, 120 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


पीएमसी बँकेची सद्यस्थिती


एकूण ठेवी - 11,000 कोटी
वितरित कर्जे - 8,383.33 कोटी
सहा राज्यांमध्ये अस्तित्त्व - महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेश
एकूण शाखा : 137