पत्नीला फाशीचं प्रात्यक्षिक दाखवताना हवालदाराला गळफास
एबीपी माझा वेब टीम | 28 Jun 2016 09:22 AM (IST)
मुंबई : तुरुंगातील कैद्यांना फाशी कशी दिली जातं, याचं प्रात्यक्षिक पत्नीला करुन दाखवताना हवालदार पतीलाच गळफास बसल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. हवालदाराची शुद्ध हरपल्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घाटकोपर पोलिस फायरिंग रेंजमधील 26 वर्षीय हवालदार गोविंद बालाजी देवळे यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली. भांडुपमध्ये राहणारे देवळे आपल्या पत्नीला कपडे वाळत घालण्याची दोरी बांधण्यासाठी मदत करत होते. त्यावेळी एका छोट्या टेबलवर चढून त्यांनी दोरीचं एक टोक लोखंडी रॉडला बांधलं. दुसरं टोक बांधताना मस्करीत त्यांनी पत्नी प्रियंकाला तुरुंगातील कैद्यांना फाशी कशी दिली जाते, याचं प्रात्यक्षिक दाखवायला सुरुवात केली. दोरीचं मोकळं असलेलं दुसरं टोक गळ्याभोवती आवळून धरलं असतानाच पायाखालचं टेबल सटकलं आणि देवळेंना गळफास बसला.