मुंबई : दादर परिसरातील एका इमारतीच्या गच्चीवर चढून एका पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, योग्य वेळी अग्निशमन दल आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यामुळे या कॉन्स्टेबलचं मन परिवर्तन करुन त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. घरगुती वादाच्या कारणातून त्याने हा प्रकार केल्याचं सांगितलं जातंय. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहे.


दादर इथल्या हिंद माता परिसरातील एका चार मजली इमारतीच्या गच्चीवर आज दुपारी साडेबारा वाजता एक पोलीस कॉन्स्टेबल चढला. सुरुवातीला स्थानिक नागरिकांनी त्याला या परिसरातून हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना स्थानिक नागरिकांना जुमानले नाही. गच्चीवरील कठड्यावर हा कॉन्स्टेबल दीड तास इकडून तिकडे फेर्‍या मारत मारू लागला. शेजारच्या इमारतीवर कोणीतरी अनेक वेळ फेऱ्या मारत असल्याचं इतर इमारतीतील लोकांच्या लक्षात आलं. त्यांनी ही घटना अग्निशमन दल आणि पोलिसांना कळवली. यावेळी पोलीस दलातील अधिकारी आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले.


पोलीस अधिकाऱ्यांनी या व्यक्ती सोबत बोलत असताना ही व्यक्ती कॉन्स्टेबल असल्याचे लक्षात आलं. काल रात्रपाळी करून तो आला होता. सुरुवातीला या अधिकाऱ्यांनी त्याला खाली येण्याची विनंती केली. काही त्रास असल्यास आम्हाला सांगावं, आपण त्याच्यावर उपाय शोधू असं सांगूनही त्याचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कॉन्स्टेबल सुशांत पवार याने या विनंतीकडे लक्ष न देता तो पुन्हा कठड्यावर फेर्‍या मारू लागला. तसंच काही वेळ तो रडत ही होता. कॉन्स्टेबलने गच्चीवरून उडी मारू नये तसेच त्याला इजा होऊ नये यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी प्रयत्न सुरू केले.


Covid-19 | देशात एका दिवसात 11 हजारांहून अधिक कोरोना बाधित; भारतातील रुग्णांची संख्या 3 लाख पार


हा कॉन्स्टेबल इमारतीच्या पाठीमागील कठड्यावर असल्यामुळे शेजारीच दुसऱ्या इमारतीच्या कठड्यावर ग्रील होतं जर तो खाली पडला तर त्याला इजा होऊ नये यासाठी या परिसरात असणाऱ्या गाद्या पोलिसांनी त्या ग्रिल वर ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच काही ठिकाणी जाळी बांधून ठेवण्यात आली होती. या कॉन्स्टेबलची समजूत काढण्याचा वरिष्ठांनी साधारण दीड तास प्रयत्न केला. दीड तासानंतर तो स्वतःहून त्या गच्चीवरील कठड्यावरून खाली येऊन तो पोलिस अधिकाऱ्यांच्या स्वाधीन झाला.

घरगुती वादाच्या कारणातून घटना घडल्याचा अंदाज
पोलीस कॉन्स्टेबल सुशांत पवार हा रात्रपाळी करून या परिसरात आला होता. त्याच्या अंगावर पोलीस वर्दीतील खाकी पँट आणि बूट होता. तर खाकी शर्ट ऐवजी दुसरा शर्ट त्याने परिधान केला होता. या पोलीस कॉन्स्टेबलला घेऊन अधिकारी चौथ्या मजल्यावरून खाली आले. यावेळी स्थानिक लोकांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केलं. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. यामुळे लोकांनी आनंद व्यक्त केला. या पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या करण्याचा किंवा इमारतीवरून उडी मारण्याचा असा प्रयत्न का केला असेल या संदर्भातला तपास पोलीस अधिकारी करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार घरगुती वादाच्या कारणातून त्याने हा प्रकार केल्याचं सांगितलं जातंय. या कॉन्स्टेबलला पोलिसांनी ताब्यात घेतला असून यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकारी अधिक तपास करत आहेत.


तब्बल दीड तासांनंतर मन परिवर्तन
साडेबारा वाजण्याच्या सुमारास आम्हाला काही लोकांचे कॉल आले आणि कळालं शिंदेवाडी बस स्टॉप शेजारी असणाऱ्या एका इमारतीवर एक व्यक्ती चढलेला आहे. आम्ही तत्काळ त्याची दखल घेत आमच्या दोन अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान पाठविले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन इमारतीच्या चारी बाजूंनी आम्ही काही ठिकाणी जाळी तर काही ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी लावून आम्ही तयार राहिलो होतो. इमारतीच्या गच्चीवर असलेला व्यक्ती पोलीस कॉन्स्टेबल असल्याचे कळालं. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत आम्हीसुद्धा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोणत्याच गोष्टीला दाद देत नव्हता. पोलीस कॉन्स्टेबलने गच्चीवरून उडी मारू नये. तसेच त्याने उडी मारली तर त्याचा जीव जाऊ नये यासाठी अग्निशमन दलातील जवानांना आम्ही सूचना दिल्या आणि रेस्क्यू ऑपरेशन राबवायला सुरुवात केली. इमारतीच्या चारी बाजूनी आम्ही तैनात होतो. तब्बल दीड तासाच्या प्रयत्नानंतर त्याचं मतपरिवर्तन करण्यात आम्हाला यश आलं. तो स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला. यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला असेच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रीया अग्निशमन दल अधिकारी मयेकर यांनी दिली.


अग्निशमन दल आणि पोलिसांमुळे अनर्थ टळला
आमच्या शेजारच्या बिल्डिंगवरील चौथ्या मजल्यावर भर उन्हात कोणीतरी फेऱ्या मारत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. काही लोकांनी दुसर्‍या इमारतीवर जाऊन या व्यक्तीला खाली येण्याची विनंती केली. पण तो कोणाकडेच लक्ष देत नव्हता. अग्निशमन दल आणि पोलीस दलातील अधिकारी आल्यामुळे पुढील अनर्थ टळल्याचं स्थानिक नागरिक श्रीहरी कामत म्हणाले.


चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचं मुंडन; कोल्हापुरातल्या तेरवाडमधील धक्कादायक घटना