मुंबईत मुलुंड येथे फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सात दिवसाच्या बाळाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी वडिलांनी पैशाची मदत सोशल मीडियावर मागितली होती. एबीपी माझानं ही बातमी सर्वांसमोर आणली होती. अवघं 7 दिवसांचं बाळ आयुष्याशी झुंजत असताना बाळाचा रुग्णालयातला वेदना देणारा व्हिडीओ समोर आला होता. याची दखल युवा सेनेचे सदस्य आणि आदित्य ठाकरेंचे जवळचे मित्र राहुल कनाल यांनी घेतली.
आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठेही खर्च न करता राहुल कनाल यांनी थेट मदत या बाळाला करण्याचं ठरवलं. या बाळाच्या उपचारासाठी राहुल कनाल यांनी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये एक लाख रुपयांची तात्काळ मदत केली आणि बाळाच्या आई वडिलांना धीर दिला. तसेच पुढील उपचारासाठी पूर्ण खर्चाची जबाबदारी आम्ही उचलणार असल्याचं सांगितलं. या मदतीनंतर राहुल कनाल यांनी समाधान व्यक्त केलं. सामाजिक भान आणि आमच्या नेत्यांचा वाढदिवस सार्थकी लावण्यासाठी याहून मोठं काम नसू शकतं. आदित्य ठाकरेंचा आज वाढदिवस आहे आम्ही या कुटुंबियांना मदत करून तो साजरा करत आहे अशी प्रतिक्रिया राहुल यांनी दिली.
जिथे आहात तिथूनच शुभेच्छा द्या, काका-पुतण्याचं वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना आवाहन
आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?
आज आपल्या महाराष्ट्र राज्यावरच नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. गेले दोन-तीन महिने आपण सगळे एकत्रितपणे या संकटाविरुद्ध लढा देत आहोत आणि हा लढा देत असताना आपले सर्वांचे एकच ध्येय आहे, ते म्हणजे कोरोनावर मात करणे.
13 जून रोजी माझा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जिथे असाल तिथूनच मला आशीर्वाद व शुभेच्छा द्याव्यात. माझी तमाम शिवसैनिक मित्रमंडळी आणि सर्वांना विनंती आहे की होर्डिंग्ज, हार तुरे, केक हा खर्च टाळून तो खर्च तुम्ही कोरोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांवर खर्च करा अथवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्या. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे एक सत्कार्य होईळ आणि याचा मला निश्चितच आनंद होईल.
प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करुन आपण प्रशासनाला सहकार्य करुया. तुम्ही सर्वजण कोरोनापासून स्वत:ची काळजी घ्या, हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट असेल. जसे तुम्ही आजपर्यंत प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत तसेच प्रेम आणि आशीर्वाद यापुढे सुद्धा माझ्यासोबत राहील हीच अपेक्षा....