मुंबई : काँग्रेसने मुंबईत फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला आहे. दादर भागात मनसे आणि काँग्रेस आमने सामने आले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

पोलिसांच्या या कारवाईत सर्वसामान्य व्यक्तींनाही जबरदस्तीने ताब्यात घेत असल्याचं दिसून येत आहे. कारण दादरमध्ये जेव्हा एका व्यक्तीला पोलिसांनी जबरदस्तीने गाडीत ढकललं तेव्हा ती व्यक्ती ओरडून सांगत होती की, ‘’मी मोर्चात नाही’’, तरीही पोलिसांनी त्या व्यक्तीला गाडीत ढकललं.

दादरमध्ये मराठी फेरीवालेदेखील आहेत, मात्र सध्या ते दहशतीत आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढणार असल्याचं मुंबई काँग्रेसकडून सांगण्यात आलं.

दरम्यान काँग्रेसचा मोर्चा शिवसेना आणि मनसेचा गढ असलेल्या दादरमध्ये होत असल्याने पोलिसांनी तुफान बंदोबस्त तैनात केला आहे.

तसंच पोलिसांनी मनसेच्या काही नेत्यांची धरपकडही सुरु केली आहे. तर व्यापाऱ्यांनी अनुचित घटनेच्या भीतीनं आपली दुकानं बंद ठेवली आहेत.

मनसेचं आंदोलन

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी रेल्वे आणि प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र तरीही फेरीवाले न हटल्याने मनसे कार्यकर्ते मुंबईसह उपनगरातील फेरीवाल्यांना हुसकावून लावत आहेत.

मनसे विभाग अध्यक्षाला मारहाण

दरम्यान मनसेने मालाडमध्येही फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केलं. मात्र या आंदोलनादरम्यान  मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. यात माळवदे यांना जबर जखम झाली.

मनसे नेते संदीप देशपांडेंना अटक आणि सुटका

मालाडमध्ये मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीही झाली. दरम्यान, यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर रात्री उशिरा संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्त्यांना सोडण्यात आले.